Intel Layoffs 2026: अमेरिकेतील प्रसिद्ध चिपनिर्मिती कंपनी इंटेलने (Intel) पुन्हा एकदा कर्मचारी कपात सुरू केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिप-बू टॅन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पुनर्रचनेचा हा एक भाग आहे. खर्च कमी करणे, कामकाज अधिक सोपे करणे आणि कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. बिझनेस इनसाइडरने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी कंपनीच्या जागतिक माहिती तंत्रज्ञान (IT) विभागातील कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र, किती कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली, याबाबत इंटेलने अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच कोणत्या विभागांमध्ये कपात करण्यात आली आहे, हेही कंपनीने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून ही कर्मचारी कपात सुरू असल्याचे समोर आले आहे.
इंटेलमध्ये गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी कपातीचे सत्र सुरू आहे. कंपनीच्या आर्थिक अहवालानुसार, सप्टेंबर 2026 अखेर इंटेलमध्ये एकूण 81,100 कर्मचारी कार्यरत होते. 2025 च्या अखेरीस ही संख्या 85,100 होती. म्हणजेच 2026 च्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 4,000 ने कमी झाली आहे.
याआधी 2024 मध्ये इंटेलने मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट गेल्सिंगर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने 15 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्याची योजना जाहीर केली होती. त्यावेळी कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता होती.
यानंतर कंपनीची जबाबदारी स्वीकारलेल्या लिप-बू टॅन यांनीही खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. कंपनीतील व्यवस्थापनाचे स्तर कमी करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि महत्त्वाच्या नसलेल्या प्रकल्पांमधून गुंतवणूक बाहेर काढणे, यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे इंटेलमध्ये कर्मचारी कपातीचे सत्र अद्याप सुरूच आहे.
इंटेलच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. प्रसिद्ध चिपनिर्मिती कंपनी एनव्हिडियाने (Nvidia) इंटेलमधील आपली गुंतवणूक कमी केल्याची माहिती समोर आली आहे.
एनव्हिडियाने 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत इंटेलमधील आपला हिस्सा 25 टक्क्यांनी कमी केला. जून अखेरीस एनव्हिडियाकडे इंटेलचे 21.478 कोटी शेअर्स होते. सप्टेंबर अखेर ही संख्या घटून 16.108 कोटी शेअर्सवर आली.
विशेष म्हणजे, सप्टेंबर 2026 मध्ये एनव्हिडियाने इंटेलमध्ये 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत इंटेलचे शेअर्स प्रत्येकी 23.28 डॉलर दराने खरेदी करण्याचे ठरले होते. डेटा सेंटर आणि संगणकांसाठी लागणाऱ्या प्रोसेसरच्या क्षेत्रात दोन्ही कंपन्यांनी एकत्र काम करण्याची योजनाही आखली होती.
मात्र, एवढी मोठी गुंतवणूक केल्यानंतरही एनव्हिडियाने इंटेलमधील आपला हिस्सा कमी केला आहे. यामागचे नेमके कारण कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंटेलच्या अडचणी केवळ कर्मचारी कपात आणि गुंतवणुकीपुरत्या मर्यादित नाहीत. कंपनीला आता भागधारकांच्या कायदेशीर आव्हानालाही सामोरे जावे लागत आहे.
PC विक्रीतील घसरण आणि डेटा सेंटर व्यवसायाची स्थिती याबाबत कंपनीने गुंतवणूकदारांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप काही भागधारकांनी केला आहे. याप्रकरणी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे येथे कंपनीविरोधात सामूहिक खटला दाखल करण्यात आला आहे.
ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या आर्थिक निकालांनंतर हा वाद अधिक वाढला. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत संगणक हार्डवेअरच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे इंटेलने स्पष्ट केले होते. याआधी कंपनीकडून मागणी सुधारत असल्याचे संकेत दिले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल अपेक्षेपेक्षा खराब आल्याने इंटेलच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली.
भागधारकांच्या दाव्यानुसार, PC ची मागणी कमी झाल्यामुळे कंपनीच्या तिमाही उत्पन्नात 9 टक्क्यांची घट झाली. यामुळे कंपनीला जवळपास 80 कोटी डॉलरचा फटका बसला आणि उत्पन्न 8.1 अब्ज डॉलरवर आले.
केवळ इंटेलच नाही, तर जगभरातील अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या सध्या कर्मचारी कपात करत आहेत. अॅमेझॉन, मेटा आणि सेल्सफोर्स यांसारख्या कंपन्यांनीही 2026 मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे.
काही कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) काम करण्याच्या पद्धतीत होत असलेल्या बदलांचाही कर्मचारी कपातीशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नोकरी टिकवणे हे मोठे आव्हान बनत आहे. एकीकडे AI मुळे तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत, तर दुसरीकडे खर्च कमी करण्यासाठी कंपन्या कर्मचारी कपातीचा मार्ग स्वीकारत आहेत.