Stock Market Today: आज व्यवहाराची सुरुवात सुस्त झाली असली, तरी नंतर बाजार थोडा सावरला. काल झालेल्या जोरदार विक्रीनंतर आज सकाळी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडले. सुरुवातीच्या काही मिनिटांत सेन्सेक्स सुमारे 200 अंकांनी घसरून 82,275 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी 40 अंकांनी घसरत 25,410 वर व्यवहार करत होता.
बँक निफ्टीही सुरुवातीला लाल रंगात होता. मात्र खरेदी होऊ लागल्या नंतर बाजार हळूहळू रिकव्हर झाला. PSU बँक आणि खासगी बँकेच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली, तर मेटल शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली.
सेक्टोरल पातळीवर आयटी, मीडिया, फार्मा, हेल्थकेअर आणि ऑटो शेअर्सवर दबाव कायम होता. निफ्टी 50 मध्ये ONGC आजही टॉप गेनर्समध्ये राहिला. Coal India, BEL, L&T, NTPC, HUL आणि Power Grid या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसली. दुसरीकडे Infosys हा आजचा टॉप लूझर ठरला. Tech Mahindra, HCL Tech, Wipro, Bajaj Finance यांसारख्या शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसत होता.
दरम्यान, जागतिक घडामोडींचा बाजारावर परिणाम झाला. अमेरिका–इराण तणाव पुन्हा वाढल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्यानंतर भू-राजकीय तणाव वाढला आहे. संभाव्य संघर्षाच्या भीतीने अमेरिकी बाजार घसरले आहेत.
या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलावरही दिसून आला. ब्रेंट क्रूड जवळपास सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचत 72 डॉलरच्या आसपास ट्रेड होत आहे. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे, कारण वाढत्या तेल किमतींमुळे महागाई आणि चालू खात्यावर दबाव वाढू शकतो. यामुळे ऑइल मार्केटिंग आणि एव्हिएशन क्षेत्रावर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.
संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्रीही बाजारासाठी डोकेदुखी ठरत आहे. काल परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) सुमारे 3,500 कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सलग पाच दिवसांच्या खरेदीनंतर जवळपास 600 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. या दुहेरी विक्रीमुळे बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.
कमोडिटी मार्केटमध्येही दबाव दिसून आला. देशांतर्गत बाजारात सोने सुमारे 950 रुपयांनी घसरलं, तर चांदीत जवळपास 2,900 रुपयांची घसरण झाली. कॉपर आणि झिंकसारख्या बेस मेटल्समध्येही सुमारे 1 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली.
कॉर्पोरेट पातळीवर आज काही स्टॉक-स्पेसिफिक हालचाली दिसू शकतात. Gaudium IVF & Women Health चा IPO आज उघडतोय, तर ABB India आणि CIE Automotive चे निकाल संमिश्र आले आहेत. दुसरीकडे, टेक सेक्टरसाठी सकारात्मक बातमी म्हणजे Tata Sons ने OpenAI सोबत भागीदारी जाहीर केली आहे, ज्यामुळे आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसू शकते.
एकूणच, अमेरिका–इराण तणाव, कच्च्या तेलात झालेली वाढ आणि FIIs ची विक्री यामुळे बाजारावर दबाव कायम आहे. मात्र AI आणि टेक क्षेत्रातील सकारात्मक घडामोडींमुळे काही निवडक शेअर्सची खरेदी होऊ शकते.