Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 150 अंकांनी घसरला, तर निफ्टीही सुमारे 40 अंकांनी घसरला. बँक निफ्टीतही जवळपास 50 अंकांची घसरण दिसून आली. मात्र, संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली असून BEL (भारत इलेक्ट्रॉनिक्स) हा आजचा टॉप गेनर ठरला. याउलट Eternal या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.
जागतिक बाजारांकडून आजही फारसे सकारात्मक संकेत मिळाले नाहीत. संपूर्ण आठवडाभर बाजार मर्यादित चौकटीतच फिरत राहिला आणि प्रमुख निर्देशांकांवर दबाव कायम राहिला. GIFT निफ्टीही सुमारे 50 अंकांनी घसरून 26,125 च्या आसपास व्यवहार करत असल्याने देशांतर्गत बाजाराची सुरुवात कमकुवत होण्याचे संकेत आधीच मिळाले होते. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे आशियाई बाजारांमध्ये व्यवहाराचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ख्रिसमसपूर्वीच्या हाफ-डे ट्रेडिंगमध्ये अमेरिकन शेअर बाजारांनी नवे उच्चांक गाठले. S&P 500 निर्देशांकाने सर्वोच्च पातळी गाठली, तर डाऊ जोन्स सलग पाचव्या दिवशी सुमारे 300 अंकांनी वाढला. नॅस्डॅकही वाढीसह बंद झाला.
परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या खरेदी विक्रीत चढ उतार होत आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) कॅश सेगमेंटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुमारे 1,721 कोटी रुपयांची विक्री केली. तरीही डेरिव्हेटिव्हसह एकूण आकडे पाहता त्यांची निव्वळ खरेदी मर्यादित राहिली. दुसरीकडे देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) जोरदार खरेदी सुरूच ठेवली असून बुधवारी सुमारे 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही सलग 83व्या दिवसाची खरेदी आहे
कमोडिटी बाजारात मात्र ऐतिहासिक तेजी कायम आहे. देशांतर्गत बाजारात चांदीने 2 लाख 24 हजार रुपयांचा नवा उच्चांक, तर सोन्याने 1 लाख 38 हजार रुपयांच्या आसपास नवा रेकॉर्ड केला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 75 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेली असून सोन्याने 4,560 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा आणि जागतिक अनिश्चितता ही या तेजीची प्रमुख कारणे आहेत.
पाच दिवसांच्या सलग तेजी नंतर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मात्र थोडीशी घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूड सुमारे 62 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास स्थिरावले आहेत. यामुळे महागाई आणि चलन बाजाराला दिलासा मिळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.