Stock Market Today: सलग दोन दिवसांच्या तेजीला आज ब्रेक लागला असून, शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी हे तिन्ही प्रमुख निर्देशांक लाल रंगात उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरला, तर निफ्टी जवळपास 70 अंकांनी खाली आला.
बँक निफ्टीमध्येही सुमारे 170 अंकांची घसरण दिसून आली. बाजारातील अस्थिरतेचे प्रतिक मानला जाणारा इंडिया व्हिक्स सुमारे 1.2 टक्क्यांनी वाढला. याचदरम्यान, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र चांगली खरेदी दिसून आली.
क्षेत्रनिहाय निर्देशांक पाहता, मेटल, रिअॅल्टी आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रात खरेदीचा कल होता. मात्र आयटी, ऑटो, एफएमसीजी, खासगी बँका, हेल्थकेअर, फार्मा आणि एनबीएफसी क्षेत्रात घसरण दिसून आली.
निफ्टी 50 मधील एलअँडटी, हिंदाल्को, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी आणि कोल इंडिया हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. याउलट मारुती, डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, टायटन, एचयूएल, टीसीएस आणि टाटा कंझ्युमर या शेअर्समध्ये घसरण झाली.
जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर काहीशी अनिश्चितता कायम असल्याने गुंतवणूकदार सावध दिसत आहेत. सोन्या-चांदीच्या किमतींनी नवे विक्रम केल्याने, मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या भूमिकेमुळे जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत.
दरम्यान, अमेरिकेच्या Federal Reserve ने यावेळी व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहेत. फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांनी अर्थव्यवस्थेची वाढ मजबूत असल्याचे सांगत महागाईबाबत सावध राहण्याची गरज व्यक्त केली.
याचा परिणाम म्हणून अमेरिकेचा एसअँडपी 500 निर्देशांक इंट्राडेमध्ये नवा उच्चांक गाठल्यानंतर स्थिर बंद झाला. नॅसडॅक सुमारे 40 अंकांनी वाढून तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला, तर डाओ जोन्स केवळ किरकोळ वाढीसह दिवसाच्या नीचांकी स्तराजवळ बंद झाला.
कमोडिटी बाजारात मात्र जोरदार तेजी पाहायला मिळाली. देशांतर्गत बाजारात सोन्याने नवा विक्रम प्रस्थापित करत प्रति 10 ग्रॅम ₹1,66,500चा स्तर गाठला. चांदीही वाढून सुमारे ₹3,88,000 च्या आसपास नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने जवळपास 400 डॉलर्सची वाढ घेत डॉलर 5,625च्या वर नवा उच्चांक गाठला. सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे आणि भू-राजकीय तणावामुळे मौल्यवान धातूंना मजबूत आधार मिळत आहे.