Work Life Balance: भारतामध्ये उशिरापर्यंत काम करणं, सुट्ट्यांमध्येही ऑफिसचे फोन उचलणं किंवा आजारी असतानाही काम करणं हे अनेकदा ‘समर्पण’ मानलं जातं. पण नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यावसायिकाचा अनुभव याच्या अगदी उलट आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका अनुभवामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्याच्या समतोलाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
विनोद नावाच्या या भारतीय व्यावसायिकाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला अनुभव सांगितला. सुमारे 15 वर्षांपूर्वी तो नॉर्वेमध्ये नोकरीसाठी गेला होता. भारतात जशी काम करण्याची सवय होती, तशीच सवय त्याला तिथे होती. आठवड्याच्या शेवटी काम करणं, जेवणाची सुट्टी टाळणं, ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबणं आणि सुट्टी रद्द करून प्रोजेक्ट पूर्ण करणं, हे त्याच्यासाठी नेहमीचं होतं.
त्याला वाटत होतं की, यामुळे वरिष्ठांवर चांगला प्रभाव पडेल आणि आपल्या मेहनतीचं कौतुक होईल. मात्र नॉर्वेमध्ये त्याच्यासोबत जे घडलं, त्याने त्याचा कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला.
विनोदने सांगितले की, नोकरीच्या सुरुवातीच्या काळात एके दिवशी त्याच्या बॉसने त्याला केबिनमध्ये बोलावलं. त्याला वाटलं की आपल्या कामाचं कौतुक होणार. पण घडलं नेमकं उलट.
त्याच्या बॉसने त्याला विचारलं, “तू शनिवारी माझ्या ई-मेलला उत्तर का दिलंस? आणि प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तू सुट्टी का रद्द केलीस? तुझा हेतू चांगला असेल, पण हे योग्य नाही.”
हे ऐकून विनोदला धक्काच बसला. त्याच्या बॉसने पुढे स्पष्ट केलं की, सुट्टी घेणं हा पर्याय नसून ते आवश्यक आहे. जर वरिष्ठ कर्मचारी सुट्टी न घेता सतत काम करत राहिले, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांना चुकीचा मेसेज जातो.
“तुझ्याकडे तुझे कनिष्ठ पाहत आहेत. त्यांनी जर तुला सुट्टीतही काम करताना पाहिलं, तर त्यांना वाटेल की खऱ्या समर्पणाचा अर्थच तो आहे. त्यामुळे सुट्टी घेणं अनिवार्य आहे,” असे त्याच्या बॉसने सांगितले.
विनोद म्हणतो, “मी खूप काम केल्यामुळे मला रागवण्यात आलं. भारतात असतो तर कदाचित मला ‘खूप समर्पित कर्मचारी’ म्हणून गौरवलं गेलं असतं. पण इथे ती गोष्ट समस्येसारखी पाहिली गेली.”
या घटनेनंतर त्याने अनेक वर्षे अंगी बाणलेल्या ‘हसल कल्चर’कडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. सतत काम, करिअरची धावपळ, स्वतःसाठी वेळ न काढणं आणि यशाच्या मागे धावत राहणं यासाठी आपण किती मोठी किंमत मोजतो, याची जाणीव त्याला झाली.
“पहिल्यांदाच मला जाणवलं की या सततच्या धावपळीने माझ्याकडून किती काही हिरावून घेतलं आहे. त्या विचाराने माझे डोळे पाणावले,” असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली. अनेकांनी भारतातील कामाच्या कल्चरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहींनी भारतात वेळेवर ऑफिसमधून बाहेर पडणंही अपराध केल्यासारखं वाटतं, अशी प्रतिक्रिया दिली.
एका युजरने लिहिलं, “ते लोक आयुष्य जगत आहेत, आपण फक्त आयुष्य ढकलत आहोत.” तर दुसऱ्याने म्हटलं, “भारतात वर्क-लाईफ बॅलन्स अजूनही स्वप्नासारखी गोष्ट आहे.”
काहींनी मात्र याकडे नेतृत्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा धडा म्हणून पाहिलं. चांगला लिडर कर्मचाऱ्यांना जास्त काम करण्यास भाग पाडत नाही, तर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
विनोदचा अनुभव केवळ एका कर्मचाऱ्याची गोष्ट नाही. तो जगभरातील वेगवेगळ्या कामाच्या कल्चर मधील फरक दाखवतो. याच फरकामुळे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.