India Economy Ranking Falls to 6th: जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र आपण गेल्या काही वर्षांत पाहिलं. पण आता थोडा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) ताज्या World Economic Outlook अहवालानुसार, भारत आता जगातील 4थ्या क्रमांकावर नसून पुन्हा 6व्या क्रमांकावर घसरला आहे.
IMF च्या अंदाजानुसार, 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था सुमारे $4.15 ट्रिलियन इतकी असेल. त्याचवेळी युनायटेड किंगडमची अर्थव्यवस्था $4.27 ट्रिलियन आणि जपानची अर्थव्यवस्था $4.38 ट्रिलियन इतकी राहणार आहे. म्हणजेच, भारत UK आणि जपानच्या मागे गेला आहे.
2022 मध्ये भारताने UK ला मागे टाकत 5वा क्रमांक मिळवला होता. त्यावेळी भारत लवकरच जर्मनी आणि जपानलाही मागे टाकेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात चित्र उलटं दिसत आहे.
1. GDP आकड्यांमध्ये बदल
भारताने अलीकडेच GDP मोजण्याची पद्धत (base year) बदलली. त्यामुळे आधी जो GDP जास्त दाखवला जात होता, तो आता कमी झाला आहे. उदा. 2025-26 साठी GDP ₹357 लाख कोटीवरून ₹345 लाख कोटींवर गेला.
2. रुपयाची घसरण
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे डॉलर स्वतःच इतर चलनांच्या (पाउंड, येन) तुलनेत कमकुवत असताना देखील रुपया अधिक घसरला. यामुळे डॉलरमध्ये GDP मोजताना भारत मागे पडतो.
जपानची अर्थव्यवस्था कमी गतीने वाढत असतानाही, भारताच्या GDP मध्ये झालेली कपात आणि रुपयाची घसरण यामुळे जपान भारताच्या पुढे गेला. UK च्या बाबतीतही असंच चित्र दिसतंय.
या सगळ्या घडामोडींनंतरही आशा संपलेली नाही. IMF च्या अंदाजानुसार भारत 2027 मध्ये पुन्हा 4थ्या क्रमांकावर येऊ शकतो आणि 2031 पर्यंत 3ऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे.
जगातील टॉप 2 अर्थव्यवस्था अजूनही खूप पुढे आहेत. अमेरिका $32 ट्रिलियन आणि चीन $20 ट्रिलियनवर आहे. पण 3 ते 6 या क्रमांकावरील देशांमध्ये फारसा फरक नाही. सगळे सुमारे $4 ट्रिलियनच्या आसपास आहेत. त्यामुळे थोड्या बदलांमुळे ही क्रमवारी बदलते.