आयकर विभागाने कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख एक दिवसाने वाढवली आहे. आता करदात्यांना 16 सप्टेंबर 2025 पर्यंत रिटर्न दाखल करण्याची संधी मिळणार आहे. आधी ही तारीख 15 सप्टेंबर होती. सरकारने हा निर्णय आयकर ई-फायलिंग वेबसाइटवरील तांत्रिक अडचणींमुळे घेतला.
गेल्या काही दिवसांपासून आयकर रिटर्न भरण्यासाठी प्रचंड प्रमाणात लोकांनी लॉगिन केल्याने वेबसाइटचा वेग खूप कमी झाला होता. काहींना फॉर्म अपलोड होत नव्हते, तर काहींना वारंवार एरर मेसेज येत होते. १५ सप्टेंबर हा दुसऱ्या तिमाहीच्या आगाऊ कर भरण्याचाही शेवटचा दिवस असल्याने वेबसाइटवर अतिरिक्त ताण आला आणि ती आणखी संथ झाली.
आयकर विभागाने सांगितले की, १५ सप्टेंबरपर्यंत तब्बल ७.३ कोटी रिटर्न भरले गेले आहेत, जे मागील वर्षाच्या ७.२८ कोटींपेक्षा जास्त आहेत. यामुळे करदात्यांचा उत्साह दिसून येतो, मात्र शेवटच्या क्षणी आलेल्या या तांत्रिक समस्येमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
आयकर विभागाने माहिती दिली आहे की १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते पहाटे २.३० वाजेपर्यंत वेबसाइट देखभालीसाठी बंद राहील. त्यामुळे करदात्यांना ही वेळ लक्षात घेऊन रिटर्न भरावा लागेल.
सामान्य करदाते, HUF, लहान व्यावसायिक – रिटर्न भरण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२५
ज्यांना ऑडिट आवश्यक आहे – ३१ ऑक्टोबर २०२५
ट्रान्सफर प्राइसिंग रिपोर्ट दाखल करणारे – ३० नोव्हेंबर २०२५
उशिरा रिटर्न भरण्याची तारीख – ३१ डिसेंबर २०२५
रिटर्न भरताना आपल्या श्रेणीनुसार योग्य फॉर्म (ITR-1, ITR-2, ITR-3, ITR-4) निवडणे महत्वाचे आहे.
जर कोणी १६ सप्टेंबरपर्यंत रिटर्न भरला नाही, तर त्याला उशिरा रिटर्न भरावा लागेल.
करपात्र उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असल्यास – ₹१,००० दंड
करपात्र उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असल्यास – ₹५,००० दंड
याशिवाय थकबाकी करावर व्याजही भरावे लागू शकते. तसेच उशिरा रिटर्न भरल्यास करदात्याला काही महत्त्वाच्या कर सवलती मिळत नाहीत.
तज्ञांचे म्हणणे आहे की शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. वेबसाइटवर अजूनही तांत्रिक समस्या येऊ शकतात. वेळेत रिटर्न भरल्यास दंड, व्याज आणि ताण यापासून वाचता येईल.
ही एक दिवसाची मुदतवाढ करदात्यांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी असली तरी पुढील वर्षीपासून वेळेत रिटर्न भरण्यावर भर देणे गरजेचे आहे.