जर तुम्ही यावर्षी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला असेल आणि परताव्याची (Refund) वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी दाखल झालेल्या आयटीआरवरील परतावा तूर्तास थांबवला आहे. ज्या करदात्यांची मागील वर्षांतील विवरणपत्रे किंवा इतर प्रकरणे तपासणीसाठी प्रलंबित आहेत, त्यांची तपासणी पूर्ण झाल्याशिवाय यावर्षीचा परतावा दिला जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत देशभरात ७५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आपले आयटीआर दाखल केले आहेत, त्यापैकी ७१ लाखांहून अधिक रिटर्न्स ई-व्हेरिफाय (e-verify) सुद्धा झाले आहेत. मात्र, अनेकांना आयकर विभागाच्या वेबसाईटवर पूर्वी दिसणारा "प्रोसेस्ड आयटीआर" (Processed ITR) हा मेसेज आता दिसत नसल्याने त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. लवकर परतावा मिळण्याची खात्री नसल्याने अनेक करदात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयकर विभागाचे हे पाऊल बनावट किंवा खोटे परताव्याचे दावे करणाऱ्यांना रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेकजण चुकीची माहिती देऊन परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रकारांना आळा घालणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विभाग आधी प्रत्येक करदात्याची जुनी रेकॉर्ड तपासत आहे आणि त्यानंतरच परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.
प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (CA) सुरेश सुराणा यांच्या मते, "करदात्यांनी यामुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्ही तुमचे विवरणपत्र योग्य आणि प्रामाणिकपणे भरले असेल आणि तुमची कोणतीही जुनी चौकशी प्रलंबित नसेल, तर तुम्हाला परतावा नक्कीच मिळेल. यासाठी थोडा उशीर होऊ शकतो, पण तुमचे पैसे बुडणार नाहीत."
दरम्यान, आयकर विभागाने करदात्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. नॉन-ऑडिट श्रेणीतील करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून वाढवून १५ सप्टेंबर २०२५ करण्यात आली आहे. यामुळे करदात्यांना आपले विवरणपत्र भरण्यासाठी अतिरिक्त ४६ दिवसांचा वेळ मिळाला आहे.