GST मधील कर चुकवेगिरीवर आळा घालण्यासाठी आणि कर अनुपालन वाढविण्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने व्यापार-ते-व्यापार (B2B) व्यवहारांच्या GST अंतर्गत ऑनलाईन बिले (ई-इन्व्हॉईस) काढण्याची मर्यादा वार्षिक विक्री-उलाढाल 10 कोटींपासून 5 कोटींपर्यंत खाली आणली आहे. तसेच करदात्यांच्या GST विवरणपत्रांची स्वयंचलित (ऑटोमेटेड) छाननी करण्याचे एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर केंद्रीय कर अधिकार्यांना उपलब्ध करून दिले आहे.
दिवसेंदिवस GST मधील वाढत असलेले घोटाळे आणि बनावट बिलांच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या वरील बदलामुळे अधिकाधिक उद्योगाकडून विशेषतः लहान आणि मध्यम व्यापारी वर्गाकडून GST कायद्याचे काटेकोर अनुपालन होईल आणि सरकारी महसूल जमा करण्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्कच्या केंद्रीय मंडळाच्या (Central Board of Indirect Taxes Customs) दि. 29 एप्रिल 2023 रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत GST करदात्यांच्या विवरणपत्रांची स्वयंचलित छानणी करणारी यंत्रणा त्वरित लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने GST विवरणपत्रांची स्वयंचलित छाननी करणारी यंत्रणा नुकतीच GST च्या सर्व अधिकार्यांना उपलब्ध करून दिली आहे. GST मध्ये सध्या कार्यान्वित असलेल्या ACES-GST या ई-गव्हर्नन्स सिस्टिममध्ये विवरणपत्रांची स्वयंचलित छानणी करणारे आणखी एक नवीन मोड्यूल जोडले गेले असल्यामुळे आता विवरणपत्रांची छानणी करण्याचे काम संगणकामार्फतच होणार आहे. आतापर्यंत हे जबाबदारीचे काम संबंधित अधिकार्यांना स्वतः करावे लागत असल्याने त्यासाठी फार वेळ द्यावा लागत असे. परंतु आता या नवीन यंत्रणेमुळे GST विभागाचे हे महत्त्वाचे काम अगदी कमी वेळेत आणि अचूक होणार आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 पासूनच्या सर्व GST विवरणपत्रांची स्वयंचलित पद्धतीने छाननी सुरू झाली असून, त्यासाठी करदात्यांची तपशीलवार माहिती कर अधिकार्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. GST सिस्टिमवर जोखीम पातळीवर विश्लेषण करून, केंद्रीय कर विभागाच्या अखत्यारातील निवडलेल्या करदात्यांच्या विवरणपत्रांची छानणी अग्रक्रमाने हातात घेतली जाणार आहे. या स्वयंचलित छानणीमध्ये करदात्यांच्या विवरणपत्रांतील सर्व त्रुटी कर अधिकार्याला त्याच्या संगणकावर दिसणार आहेत. तसेच GSTN Common Portal च्या माध्यमातून त्याला करदात्यांशी संवाद साधण्याची सोय असल्यामुळे संबंधित करदात्याला त्याच्या त्रुटी कळविणे (FORM ASMT-10), त्यावर त्याचे उत्तर/म्हणणे प्राप्त करून घेणे (FORM ASMT-11) आणि पुढील कारवाई अंतर्गत करदात्याचे म्हणणे मान्य करणे (FORM ASMT-12) किंवा नोटिसा पाठविणे हे कर अधिकार्यांना सोपे झाले आहे. विवरणपत्रातील त्रुटीसाठी ऑनलाईन नोटीस दिली जाईल तसेच जर ती विश्वसनीय चूक असेल, तर करदात्याला त्याचे विवरणपत्र दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल.
विवरणपत्रातील त्रुटी शोधून काढण्यासाठी आता GST विभागाकडून स्वयंचलित छानणी (ऑटोमेटेड स्क्रुटिनी) बरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), इतर माहिती विश्लेषण (डेटा अॅनालिसिस), बँक अकाऊंटस् आणि करदात्याचे अर्थिक व्यवहार, अशा सर्व गोष्टींचा वापर करण्यात येणार असल्याने इथून पुढे करदात्यांनी GST विवरणपत्रे भरताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा :