HubSpot Layoffs 2026 : हबस्पॉट (HubSpot) ही सॉफ्टवेअर कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ग्राहक सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करत कामकाजात फेररचना करणार आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून कंपनीने आपल्या जागतिक कर्मचारी वर्गापैकी सुमारे ७% म्हणजेच ६६० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीने मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी कर्मचारी कपातीची घोषणा केली. या निर्णयाला १ ऑक्टोबर २०२६ रोजी मंजुरी देण्यात आली होती.
संबंधित पुनर्रचनेसाठी ६५ दशलक्ष ते ७५ दशलक्ष डॉलर्स इतका खर्च येईल, असा अंदाज हबस्पॉट कंपनीने व्यक्त केला आहे. या खर्चामध्ये कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी रक्कम, नोटीस कालावधीतील वेतन, कर्मचाऱ्यांच्या संक्रमण काळातील खर्च आणि इतर लाभांचा समावेश असेल. यातील बहुतांश खर्च आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत नोंदवला जाण्याची शक्यता आहे. 'हबस्पॉट'ने म्हटलं आहे की, कर्मचारी कपातीची प्रक्रिया २०२७ च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
'हबस्पॉट'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यामिनी रंगन यांच्या मते, हा निर्णय केवळ खर्च कमी करण्यासाठी घेतलेला नाही, तर कंपनीच्या कामाच्या पद्धतीतील बदलांमुळे आणि व्यवसायाची नव्याने रचना करण्यासाठी ही कपात करण्यात आली आहे. "स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आम्हाला आमच्या संस्थात्मक रचनेतही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. हा बदल आमची उत्पादने, किंमत निश्चिती आणि ग्राहकांना सेवा देण्याची पद्धत यात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे," असे रंगन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे.
हबस्पॉटमधील अधिकाऱ्यांचे आणि व्यवस्थापनाचे वेगवेगळे टप्पे कमी करून काम अधिक वेगाने करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यासोबतच, प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात निर्णय घेण्याचे अधिकार सोपवण्यावर कंपनीचा भर असेल, असेही रंगन यांनी स्पष्ट केले आहे.
'बोस्टन ग्लोब'च्या वृत्तानुसार, रंगन यांनी स्पष्ट केले की, ही कर्मचारी कपात 'एआय'मुळे वाढलेल्या कार्यक्षमतेचा किंवा केवळ खर्च कपातीच्या मोहिमेचा परिणाम नाही.
'बोस्टन ग्लोब'ने दिलेल्या माहितीनुसार, या 'सेव्हरन्स पॅकेज'मध्ये किमान २० आठवड्यांच्या मूळ पगाराचा समावेश आहे, तसेच प्रभावित कर्मचाऱ्यांना त्यांचे लॅपटॉप स्वतःकडे ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. या पॅकेजद्वारे कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी शोधण्याच्या प्रक्रियेतही मदत पुरवली जाईल.
सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी कंपनीचे शेअर्स $२२०.६१ वर बंद झाले; म्हणजेच २०२६ च्या सुरुवातीपासून या शेअर्समध्ये सुमारे ४५% ची घसरण झाली आहे. मंगळवारी दुपारच्या सत्रातील व्यवहारांदरम्यानही शेअर्समध्ये काही प्रमाणात घट दिसून आली. या फेरबदलांमुळे होणारा खर्च कंपनीच्या रोजच्या नियमित खर्चात धरला जाणार नाही, असे हबस्पॉटने स्पष्ट केले. तसेच, १७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या कंपनीच्या विशेष बैठकीत ठरवलेली कमाई आणि नफ्याची उद्दिष्टे कंपनी नक्की पूर्ण करेल, असा विश्वासही रंगन यांनी व्यक्त केला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर स्वीकारताना आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना काढण्याचे सत्र सुरू आहे. अशातच 'हबस्पॉट' कंपनीनेही नोकरकपातीची घोषणा केली आहे. केवळ मे महिन्यातच AI मुळे तब्बल ३८,५७९ जणांना नोकरी गमवावी लागली. 'चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस' या आउटप्लेसमेंट फर्मने २०२३ पासून AI मुळे होणाऱ्या नोकरकपातीची नोंद ठेवण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासूनची ही एकाच महिन्यातील सर्वात मोठी कपात ठरली आहे. मात्र, काही कंपन्यांना नंतर आपला निर्णय बदलावाही लागला. ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते, त्यांची कामे AI पूर्णपणे करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर कंपन्यांनी AI मुळे केलेली नोकरकपात मागे घेतली.