Unclaimed Financial Assets: अनेकदा बँक खात्यातील रक्कम, विमा दावे, शेअर्स, लाभांश किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वर्षानुवर्षे दाव्याविना पडून राहते. अनेक नागरिकांना अशा पैशांबद्दल माहितीही नसते. आता ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नागरिकांना त्यांच्या नावावर असलेली दाव्याविना पडून असलेली आर्थिक मालमत्ता शोधता यावी यासाठी एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमुळे बँक ठेवी, विमा दावे, शेअर्स, लाभांश आणि म्युच्युअल फंडातील विसरलेली किंवा न मिळालेली रक्कम तपासता येणार आहे.
सरकारच्या मते, या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आर्थिक जागरूकता वाढेल, आर्थिक माहिती मिळवणे अधिक सोपे होईल आणि आर्थिक व्यवस्थेवरील विश्वासही वाढेल.
या नव्या पोर्टलवर नागरिकांना खालील प्रकारच्या दाव्याविना असलेल्या मालमत्तेची माहिती मिळू शकते.
बँक ठेवी (Bank Deposits)
विमा दावे (Insurance Claims)
शेअर्स (Shares)
लाभांश (Dividends)
म्युच्युअल फंड गुंतवणूक (Mutual Funds)
यापूर्वी या प्रत्येक प्रकारच्या मालमत्तेसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांवर जावे लागत होते. आता सर्व माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांनी सर्वप्रथम अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला विविध आर्थिक मालमत्तांचे पर्याय दिसतील. त्यामधून संबंधित विभाग निवडावा.
उदाहरणार्थ, म्युच्युअल फंडातील दाव्याविना रक्कम तपासायची असल्यास त्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर PAN क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. मोबाईलवर आलेला OTP टाकल्यानंतर संबंधित माहिती पाहता येईल.
विमा दावा तपासण्यासाठीही PAN क्रमांकासोबत मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीची आवश्यकता असेल.
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, हा उपक्रम 'Your Money, Your Right' या देशव्यापी मोहिमेचा भाग आहे. आर्थिक क्षेत्रातील नियामक संस्था, बँका आणि इतर संबंधित संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे.
अर्थ सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी या पोर्टलचे उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, एकाच व्यासपीठावर विविध शोध सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या हक्काची आर्थिक मालमत्ता परत मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
सरकारच्या मते, हे पोर्टल अधिक पारदर्शक, सुलभ आणि नागरिककेंद्रित आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. अनेकांच्या नावावर पडून असलेली लाखो रुपयांची रक्कम शोधून काढण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरू शकते.
तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर कुठे दाव्याविना पैसे अडकले आहेत का, याची खात्री करण्यासाठी हे पोर्टल फायदेशीर ठरू शकते.