Gopichand P Hinduja Passes Away at 85: हिंदुजा समूहाचे चेअरमन आणि भारतीय वंशाचे सुप्रसिद्ध उद्योगपती गोपीचंद पी. हिंदुजा यांचे बुधवारी लंडनमध्ये निधन झाले. ते 85 वर्षांचे होते आणि गेल्या काही काळापासून आजारी होते. जगभरातील व्यावसायिक वर्तुळातून त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे.
गोपीचंद हिंदुजा हे प्रसिद्ध चार हिंदुजा भावांपैकी दुसरे मोठे भाऊ होते. त्यांचे मोठे भाऊ श्रीचंद हिंदुजा यांचे 2023 साली निधन झाले होते, तर प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा हे दोघे अजूनही सक्रिय आहेत. व्यवसाय जगतात त्यांना सर्वत्र “जीपी हिंदुजा” या नावाने ओळखले जायचे.
गोपीचंद हिंदुजा हे सध्या हिंदुजा ग्रुप आणि हिंदुजा ऑटोमोटिव लिमिटेडचे (UK) अध्यक्ष होते. त्यांनी 1959 साली मुंबईत कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर समूहाचा जगभर विस्तार केला.
1984 मध्ये हिंदुजा समूहाने गल्फ ऑईल कंपनीचे अधिग्रहण केले आणि त्यानंतर 1987 मध्ये त्यांनी भारतातील ऑटोमोबाईल कंपनी अशोक लेलँड विकत घेतली. या अधिग्रहणाने फक्त अशोक लेलँडलाच नवसंजीवनी दिली नाही, तर भारतीय उद्योगविश्वात हिंदुजा समूहाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आजही हे अधिग्रहण भारतीय कॉर्पोरेट जगतातील सर्वात यशस्वी अधिग्रहण मानले जाते.
गोपीचंद हिंदुजा यांनी मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून पदवी घेतली होती. नंतर लंडनमधील वेस्टमिन्स्टर विद्यापीठ आणि अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रिचमंड यांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली.
त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुजा समूहाने ऑटोमोबाईल, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, आरोग्य, रिअल इस्टेट, ऊर्जा आणि मीडिया या अकरा क्षेत्रांमध्ये विस्तार केला. या समूहाच्या पोर्टफोलिओमध्ये इंडसइंड बँक आणि नेक्स्ट डिजिटल लिमिटेड यांसारखे अनेक नामांकित ब्रँड्स आहेत.
अलीकडेच प्रसिद्ध ‘संडे टाइम्स रिच लिस्ट 2025’ मध्ये गोपीचंद हिंदुजा यांच्या कुटुंबाला 32.3 अब्ज पौंड (सुमारे 3.4 लाख कोटी रुपये) इतक्या संपत्तीसह ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर हिंदुजा ग्रुप आणि भारतीय उद्योगविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.