Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: धनत्रयोदशी संपताच सोन्याला उतरती कळा! भावात २,५०० रुपयांची घसरण; चांदीही झाली स्वस्त

Gold Silver Price Today: ७ नोव्हेंबर रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १,४३,६०० रुपयांवर आला आहे.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज (७ नोव्हेंबर) घसरण झाली आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे, कोलकाता आणि चेन्नईमध्येही सोन्याचे दर खाली आले आहेत. दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराई आणि आगामी सणांसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष सोन्याच्या दरांकडे लागले आहे.

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १.४३ लाखांच्या पुढे

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार ७ नोव्हेंबर रोजी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ४३ हजार ६०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ३१ हजार ६४० रुपये आहे.

मुंबई आणि कोलकात्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ४३ हजार ४५० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ४९० रुपये आहे.

चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ४३ हजार ३४० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ३९० रुपये आहे.

पुणे आणि बंगळुरूमध्येही सोन्याचे दर मुंबईप्रमाणेच आहेत. या दोन्ही शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ४३ हजार ४५० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ४९० रुपये आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण

धनत्रयोदशीच्या दिवशी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. बाजारात खरेदीसाठी ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे तब्बल २ हजार ५०० रुपयांनी कमी झाला.

सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ग्राहक सध्या खरेदी करताना सावध भूमिका घेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत फारशी वाढ झाल्याचे दिसून आले नाही.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ४,०७४.३६ डॉलरवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत ५.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

चांदीचे दरही घसरले; आजचा भाव किती?

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही आज घसरण झाली आहे. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा दर प्रति किलो २ लाख ४ हजार ९०० रुपये इतका आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीच्या दरात प्रति किलो २ हजार रुपयांची घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस ५२.१८ डॉलरवर आहे.

एकीकडे सोन्याचे दर वाढल्यानंतर आता त्यात काहीशी घसरण होत आहे. तर चांदीच्या किमतीतही घसरण दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीचे दर कोणत्या दिशेने जातात, याकडे ग्राहकांसह सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

नोंद: वरील दर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आहेत. शहर, सराफा व्यापारी, जीएसटी आणि मेकिंग चार्जेसनुसार प्रत्यक्ष खरेदीचा दर बदलू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT