Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात घसरण सुरुच; 24 आणि 22 कॅरेट सोनं आणखी स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Silver Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असून दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,36,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी राजधानी दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1,36,940 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,25,540 रुपये आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात काल 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 900 रुपयांची घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. सध्या जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 3,856.52 डॉलर प्रति औंस आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत 4.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.

अमेरिकेतील व्याजदरांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम?

सोन्याच्या दरातील घसरणीमागे जागतिक आर्थिक घडामोडी हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. अमेरिकेत डिसेंबर महिन्यात प्रमुख व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्याजदर वाढल्यास सोन्याच्या किमतीवर आणखी दबाव येऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर आणखी कमी होणार का, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी सोन्याच्या भविष्यातील किमतींबाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, 2027 च्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 6,200 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. तसेच चांदीचा भाव 180 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई, पुणे, दिल्लीसह मोठ्या शहरांतील सोन्याचे दर

17 नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. शहरानुसार 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहेत. मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार-

दिल्ली: राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1,36,940 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,25,540 रुपये आहे.

मुंबई आणि कोलकाता: या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,36,790 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1,25,390 रुपये मोजावे लागत आहेत.

चेन्नई: चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,36,790 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,25,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे आणि बंगळुरू: या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,36,790 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,25,390 रुपये आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण सुरू आहे. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव 1,89,900 रुपये प्रति किलो इतका होता. दिल्लीच्या सराफा बाजारात एकाच दिवसात चांदीच्या किमतीत 5,000 रुपयांची घसरण झाली आहे.

विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीने देशांतर्गत बाजारात 4 लाख रुपये प्रति किलोचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या स्पॉट सिल्व्हरचा भाव 47.05 डॉलर प्रति औंस आहे.

सोने-चांदी खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का?

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना खरेदीची संधी आहे. मात्र, अमेरिकेतील व्याजदर, जागतिक बाजारातील परिस्थिती आणि डॉलरमधील चढ-उतार यांचा परिणाम पुढील काळातही या किमतींवर होऊ शकतो.

त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे. तसेच दागिने खरेदी करताना सोन्याची शुद्धता, हॉलमार्क, घडणावळ आणि जीएसटी यांची माहिती घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT