मुंबई : राजेंद्र पाटील
मागील काही दिवसांपासून सराफ बाजारात सोने-चांदी दरवाढीचा भूकंप होत असून, गुरुवारी तर दरवाढीचा महाभूकंप झाला आणि मुंबई सराफ बाजारात सोने 1 लाख 86 हजार रुपये तोळ्यापर्यंत पोहोचले. एका तोळ्यासाठी जीएसटी, घडणावळीसह 2 लाख 1 हजार 580 रुपये मोजावे लागले. चांदीनेही चार लाखांचा टप्पा पार केला. गुरुवारी चांदीचा भाव 4 लाख 12 हजार रुपये किलो राहिला.
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचे पडसाद सोने-चांदी दरांवर दररोज उमटत आहेत. गुरुवारी दरांनी विक्रमी मजल मारली आणि सोने व चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला. विशेषत:, चांदीने प्रथमच एका दिवसात 43 हजार 780 रुपयांची विक्रमी वाढ नोंदविली. बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो 3 लाख 80 हजार 580 रुपये इतका होता. गुरुवारी तो थेट 4 लाख 24 हजार 360 रुपयांवर पोहोचला. या वर्षअखेरीस चांदीचे दर कुठला टप्पा गाठतील, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.
इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीला सांगितले की, गुरुवारी मुंबई सराफ बाजारात एका दिवसात सहा हजार तर जळगाव सुवर्णनगरीत 11 हजार 500 रुपये सोने तोळ्या मागे वधारले. मुंबईत सराफ बाजारात दररोज सरासरी 100 ते 150 कोटींची उलाढाल होते. मात्र गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने अपेक्षित उलाढाल झाली नाही. दिवसभरात सुमारे 35 ते 40 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती कुमार जैन यांनी दिली.
जानेवारीत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने तोळ्याला 1 लाख 38 हजार रुपये होते. त्याआधी 31 डिसेंबरला 1 लाख 40 हजार रुपये तोळे होते. जानेवारी महिनाअखेर 48 हजार रुपयांची दणदणीत वाढ सोन्यात झाली.
फेब्रुवारी अखेरपर्यंत सोने 2 लाख रुपये तोळे तर चांदी 4 लाख 25 हजार रुपये किलोपर्यंत पोहोचेल आणि त्याशिवाय जीएसटी आणि घडणावळीसाठीचे पैसे गृहित धरता त्यात 15 ते 16 हजार रुपये जादा मोजावे लागतील.