

दिलीप सपाटे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांची अकाली एक्झिट आणि शरद पवारांच्या वयोमानामुळे दोन्ही राष्ट्रवादीपुढे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अजितदादांना अखेरचा निरोप देताच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्षीय विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका संपताच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीचे विलीनीकरण व्हावे अशी दोन्ही पक्षांतील नेते, आमदार, खासदार आणि मंत्र्यांची भावना व्यक्त केली आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निवडणूक आपापल्या चिन्हावर लढविली होती. जिल्हा परिषद निवडणुकीतही अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत.
या पार्श्वभूमीवर, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शिंदे म्हणाले, आता सत्य बोलणे गरजेचे आहे. महापालिका निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ, असे अजित पवार म्हणाले होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या होत्या, अशी माहितीही त्यांनी दिली. अजित पवार हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते. आता त्यादृष्टीनेच आमची वाटचाल होईल, असे सांगत त्यांनी दोन्ही पक्षांच्या विलनीकरणाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच आहेत. आता वेगळे राहून चालणार नाही, एकत्रच रहावे लागणार आहे, असे विधान केले.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दोन्ही पक्षांकडून सकारात्मक भूमिका आहे. शरद पवारांचा विलीकरणास विरोध नसला तरी भाजपसोबत जाण्यास ते तयार होतील का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. ते राजकारणापासून अलिप्त राहून या विलिनीकरणाला विरोध करणार नाहीत, असे शरद पवार गटातील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत सकारात्मक भूमिका मांडली जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाल्यास या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार स्वतः नेतृत्व घेणार नाहीत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार हे दोघेही तेवढे अनुभवी नाहीत. पार्थ पवार आणि युगेंद्र पवार हे तरुण नेतेही पक्षातील बड्या नेत्यांचे नेतृत्व करू शकणार नाहीत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा असली तरी पवार कुटुंबाच्या बाहेर पक्षाची सूत्रे जाण्याची शक्यता कमीच आहे. अशावेळी अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या दोघींकडे महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता दोन्ही राष्ट्रवादीतील जबाबदार नेते व्यक्त करत आहेत.