Gold Silver Price Today: गेल्या दोन सत्रांपासून सुरू असलेली सोन्या-चांदीच्या दरातील तेजी सोमवारी थांबली. एमसीएक्सवर सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या दरात ₹1,300 पेक्षा जास्त, तर चांदीच्या दरात सुमारे ₹1,800 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिका-इराणमधील वाढता तणाव, मध्य-पूर्वेतील परिस्थिती तसेच महागाई आणि व्याजदरांबाबतच्या अपेक्षांचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर दिसून आला.
एमसीएक्सवर 5 ऑक्टोबर डिलिव्हरीचे सोने मागील सत्रात ₹1,54,381 प्रति 10 ग्रॅम या दरावर बंद झाले होते. मात्र, आज ते ₹1,53,500 वर उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव आणखी घसरून ₹1,53,050 प्रति 10 ग्रॅम या पातळीवर पोहोचला. म्हणजेच मागील बंद भावाच्या तुलनेत सुमारे ₹1,331ची घसरण झाली.
याचबरोबर डिसेंबर डिलिव्हरीच्या चांदीच्या वायदा दरातही मोठी घसरण झाली. चांदीचा भाव सुमारे ₹1,795ने घसरून ₹2,39,808 प्रति किलो झाला. गेल्या दोन सत्रांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे आजच्या घसरणीकडे काही प्रमाणात नफावसुली म्हणूनही पाहिले जात आहे.
जागतिक बाजारात सध्या अमेरिका आणि इराणमधील तणावासह मध्य-पूर्वेतील घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. या परिस्थितीचा महागाईवर तसेच भविष्यातील व्याजदरांच्या निर्णयांवर काय परिणाम होईल, याचा अंदाज बाजार घेत आहे.
दरम्यान, कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली असली तरी जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांकडून सोन्या-चांदीतील नफावसुली झाल्याने त्यांच्या दरावर दबाव आला.
फिजिकल मार्केटमध्येही सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात घट झाली. उपलब्ध दरांनुसार, 24 कॅरेट सोनं ₹160ने घसरून ₹1,55,680 प्रति 10 ग्रॅम झाले. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹150ने कमी होऊन ₹1,42,700 प्रति 10 ग्रॅम झाला.
त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याचा दर ₹120ने घसरून ₹1,16,760 प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली असून ती सुमारे ₹5,000ने स्वस्त होऊन ₹2,50,000 प्रति किलो झाली.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात फारसा फरक दिसत नाही. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,55,680 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,42,700, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,16,760 प्रति 10 ग्रॅम आहे. भिवंडी आणि लातूर येथे 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,55,710, 22 कॅरेट ₹1,42,730, तर 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,16,790 प्रति 10 ग्रॅम आहे.
टीप: सोन्या-चांदीचे दर दिवसभरात बदलू शकतात. प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी स्थानिक सराफा बाजारातील दर, जीएसटी आणि मेकिंग चार्जेस यामुळे अंतिम किंमत वेगळी असू शकते.