Gold Price Crash India Stock Market Fall Pudhari
अर्थभान

Gold Price Crash: 4 दिवसांत सोनं 50 हजारांनी स्वस्त; चांदी आणि शेअर बाजारही कोसळले, नेमकं कारण काय?

Gold Price Crash India: ईरान-इस्त्रायल संघर्षामुळे सोने, चांदी आणि शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या किमतीत सुमारे 50 हजार रुपयांची घसरण झाली.

Rahul Shelke

Gold Price Crash India Stock Market Fall: मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक घडामोडींचा परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. ईरान-इस्त्रायल संघर्ष वाढत असताना कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम सोने, चांदी आणि शेअर बाजारावर झाला आहे. गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांसाठी परिस्थिती अत्यंत अस्थिर झाली आहे.

गेल्या चार दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम सुमारे 15,479 रुपयांवर आला असून त्यात लक्षणीय घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर घसरुन 14,190 रुपये प्रति ग्रॅमवर आला आहे.

गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, अवघ्या चार ट्रेडिंग सत्रांत 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅममागे सुमारे 50 हजार रुपयांची घसरण झाली आहे. साधारणपणे हा काळ सोन्याच्या खरेदीसाठी अनुकूल मानला जातो, मात्र यंदा बाजारातील अस्थिरतेमुळे चित्र वेगळं दिसत आहे.

चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. 19 मार्च रोजी दिल्लीत चांदीचा दर प्रति ग्रॅम 260 रुपयांवर आला आहे. 10 ग्रॅम चांदीची किंमत 2,600 रुपयांवर आली असून 100 ग्रॅम आणि 1 किलो चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. 1 किलो चांदीचा दर 2,60,000 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

दरम्यान, शेअर बाजारातही मोठी पडझड पाहायला मिळाली. सलग तीन दिवसांच्या तेजी नंतर बाजारात अचानक घसरण झाली. सेन्सेक्स सुमारे 2,000 अंकांनी घसरला आणि गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घसरणीमागे जागतिक तणावासोबतच देशांतर्गत घडामोडीही कारणीभूत आहेत.

विशेष म्हणजे, HDFC बँकेच्या चेअरमनच्या अचानक राजीनाम्याने बाजारातील वातावरण अधिकच नकारात्मक झालं. आधीच जागतिक दबावाखाली असलेल्या बाजाराला या बातमीचा मोठा धक्का बसला आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला.

सध्या सोनं, चांदी आणि शेअर बाजार तिन्ही ठिकाणी अस्थिरता दिसून येत आहे. जागतिक राजकीय परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती आणि देशांतर्गत घडामोडी यावर पुढील काही दिवस बाजाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या सावध राहून निर्णय घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT