Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात 24 कॅरेट सोनं 5,950 रुपयांनी स्वस्त

Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,37,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण होण्याचे सत्र सुरूच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 37 हजार 760 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर मुंबईमध्ये हाच दर 1 लाख 37 हजार 610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्यातही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. या काळात 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅममागे तब्बल 5,950 रुपयांनी कमी झाले. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 5,450 रुपयांची घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,892.42 डॉलर प्रति औंस आहे. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत तब्बल 4.5 टक्क्यांची घसरण झाली.

मात्र, सध्या सोन्याचे दर कमी होत असले तरी भविष्यात त्यामध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांच्या अंदाजानुसार, 2027 च्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 6,200 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. तसेच चांदीचा भाव 180 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

16 नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार -

दिल्ली: राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,37,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1,26,290 रुपये मोजावे लागत आहेत.

मुंबई आणि कोलकाता: या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,37,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,26,140 रुपये आहे.

चेन्नई: चेन्नईमध्ये सोन्याचे दर इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत अधिक आहेत. येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,38,480 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,26,940 रुपये आहे.

पुणे आणि बंगळुरू: या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,37,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,26,140 रुपये आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही घसरण सुरूच आहे. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव 1,94,900 रुपये प्रति किलोवर आला आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची घट झाली.

विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात देशात चांदीच्या किमतीने 4 लाख रुपये प्रति किलोचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या स्पॉट सिल्व्हरचा भाव 48.80 डॉलर प्रति औंस आहे.

एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. मात्र, आगामी काळात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता बाजारातील पुढील घडामोडींकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT