Gold-Silver Forecast: सोन्या-चांदीबद्दल गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. बाजारात अनिश्चितता वाढली की अनेकजण सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. याच पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा अंदाज आहे की सोन्यातील तेजी पुढील काही दिवस कायम राहू शकते, तर अलीकडेच जोरदार वाढ झालेल्या चांदीच्या तेजीला थोडा ब्रेक लागू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या भाव आणखी वाढणार आहेत. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सेफ हेवन डिमांड म्हणजेच बाजार अस्थिर झाला की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक शोधतात आणि तेव्हा सोन्याची मागणी वाढते.
याशिवाय अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेड (Federal Reserve) व्याजदरात कपात करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे सोन्याचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात बाजाराचे लक्ष महागाईचे आकडे, GDP वाढ, बेरोजगारी आणि PCE (Private Consumption Expenditure) डेटा यावर असेल. या आकड्यांमुळे सोन्याच्या भावांची पुढची दिशा ठरू शकते.
MCX (Multi Commodity Exchange) वर मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. सोने 2.7% वाढून प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,43,590 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलं आहे. तज्ज्ञांच्या मते रुपया कमकुवत होणे आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी यामुळे सोन्याला आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यात तेजी आहे. कॉमेक्सवर (Comex) सोन्याचा वायदा दर वाढून 4,595 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आणि आठवड्यात तो 4,650 डॉलरच्या आसपास पोहचला आहे.
तज्ज्ञांच्या मते सोने अजून महाग होऊ शकतं. भू-राजकीय तणाव, डॉलरची घसरण, बॉन्ड यिल्ड कमी असणं आणि मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची सततची खरेदी, या गोष्टींमुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. काही विश्लेषकांचा अंदाज आहे की MCX वर सोने 1,46,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतं, तर जागतिक बाजारात 4,750 डॉलर प्रति औंसपर्यंतचा स्तरही गाठू शकतं.
तसचं चांदीत मागच्या आठवड्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. MCX वर चांदीचे दर तब्बल 14% वाढून प्रति किलो 2,92,960 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीचा भाव वाढून 88.53 डॉलर प्रति औंस झाला.
तज्ज्ञ सांगतात की चांदीत इतकी मोठी वाढ झाल्यानंतर थोडा ब्रेक लागणं किंव करेक्शन येणं स्वाभाविक आहे. म्हणजे दर थोडे खाली येऊ शकतात किंवा काही दिवस मर्यादित रेंजमध्ये फिरू शकतात. मात्र दीर्घकालीन चित्र अजूनही सकारात्मक आहे, असा अंदाज आहे.
सोने आणि चांदी या दोन्ही गोष्टी आकर्षक वाटत असल्या, तरी भाव सध्या उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना घाई न करता स्वतःची गरज, कालावधी आणि जोखीम क्षमता पाहूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
टीप: ही बातमी माहितीच्या उद्देशाने आहे. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.