Gold Price History Pudhari
अर्थभान

Gold Price History: स्वातंत्र्यावेळी 79 रुपये असलेलं 10 ग्रॅम सोनं आज 1.6 लाखांवर; सोन्याने 79 वर्षांत दिला चकित करणारा परतावा

Gold Price History: भारतामध्ये 1955 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत केवळ ₹79 होती, जी 2026 मध्ये वाढून ₹1.6 लाखांवर पोहोचली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Price History: भारतामध्ये सोन्याला नेहमीच विशेष महत्त्व राहिले आहे. केवळ दागिन्यांपुरते मर्यादित न राहता, संपत्ती, सुरक्षितता आणि परंपरेचे प्रतीक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक दशकांमध्ये भारतातील सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असून बदलती आर्थिक परिस्थिती, महागाई, जागतिक अस्थिरता आणि गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे या मौल्यवान धातूचे मूल्य सातत्याने वाढताना दिसत आहे.

अलीकडे केंद्र सरकारने सोन्या आणि चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर भारतात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली असून गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे आकर्षित होत आहेत.

एकेकाळी 10 ग्रॅम सोन्यासाठी केवळ ₹79 मोजावे लागत होते, तर आज 2026 मध्ये त्याच सोन्याचा भाव ₹1.6 लाखांच्या पुढे गेला आहे. हा प्रवास केवळ किंमतीतील वाढ दाखवत नाही, तर काळानुसार सोन्याचे वाढते आर्थिक महत्त्वही स्पष्ट करतो.

भारतातील सोन्याच्या किंमतींचा प्रवास

GOLD PRICES IN INDIA OVER THE YEARS

सोन्याच्या किंमतींमध्ये एवढी मोठी वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महागाई. काळानुसार पैशाची क्रयशक्ती कमी होत गेली, पण सोन्याने आपले मूल्य टिकवून ठेवले. त्यामुळे आर्थिक अनिश्चिततेच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात.

याशिवाय, जागतिक युद्धसदृश परिस्थिती, भू-राजकीय तणाव, डॉलरच्या किंमतीतील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय मागणी वाढल्यामुळेही सोन्याच्या किंमतींना मोठा आधार मिळाला. भारतात लग्नसराई, सण-उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांमुळे सोन्याची मागणी कायम वाढत राहिली आहे.

गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सोने दीर्घकालीन सुरक्षित पर्याय मानले जाते. अनेक भारतीय कुटुंबे केवळ दागिन्यांसाठीच नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी संपत्ती म्हणूनही सोनं खरेदी करतात. आर्थिक संकट किंवा शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे ‘सेफ हेवन अॅसेट’ म्हणून पाहतात.

भारतामध्ये सोन्याचे महत्त्व केवळ आर्थिक नाही, तर भावनिक आणि सांस्कृतिकही आहे. लग्नसमारंभ, दिवाळी, अक्षय तृतीया किंवा कौटुंबिक परंपरा... प्रत्येक ठिकाणी सोनं महत्त्वाचा भाग राहिला आहे. अनेक कुटुंबांसाठी ते आर्थिक सुरक्षेचं साधन मानलं जातं, जे गरजेच्या वेळी मदतीला येऊ शकते.

79 रुपयांपासून सुरू झालेला सोन्याचा हा प्रवास आता ₹1.6 लाखांच्या पुढे पोहोचला आहे. बदलत्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्येही सोन्यावरील लोकांचा विश्वास कायम आहे. त्यामुळेच काळ बदलला, अर्थव्यवस्था बदलली, पण भारतीयांच्या मनातील सोन्याचं स्थान मात्र आजही कायम राहिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT