Gold Price Forecast: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होत आहेत. मध्यपूर्वेतील तणाव, जागतिक आर्थिक घडामोडी आणि अमेरिकेच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र जागतिक आर्थिक संस्था जेपी मॉर्गनने (JP Morgan) सोन्याबाबत केलेल्या भाकितामुळे गुंतवणूकदार चकित झाले आहेत.
जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. हा अंदाज खरा ठरल्यास भारतीय बाजारात सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतात.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर विविध आर्थिक आणि भू-राजकीय घडामोडींमुळे मर्यादित आहे. मात्र जेपी मॉर्गनचा अंदाज आहे की, यावर्षीच्या चौथ्या तिमाहीपर्यंत सोन्याचा दर प्रतिऔंस 6,000 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. 2027 अखेर हा दर 6,300 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जर हा अंदाज प्रत्यक्षात उतरला, तर भारतात 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 2.13 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
2026 मध्ये सोन्याच्या बाजारासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे इराण आणि मध्यपूर्वेतील तणाव. फेब्रुवारी पासून सोन्याच्या किमतीत जवळपास 20 टक्क्यांची घसरण झाली होती. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि जागतिक महागाईबाबत चिंता निर्माण झाली होती.
महागाई वाढल्यास अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर ठेवू शकते, अशी भीती बाजारात निर्माण झाली. सोन्यावर व्याज मिळत नसल्याने अशा काळात गुंतवणूकदार रोखे आणि इतर व्याज देणाऱ्या साधनांकडे वळतात. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होऊन भावात घसरण झाली.
जेपी मॉर्गनच्या मते, काही महत्त्वाचे घटक आगामी काळात सोन्याला मोठा आधार देऊ शकतात. जागतिक महागाई दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता, डॉलरची खरेदी क्षमता कमी होणे, अमेरिकेतील आर्थिक अनिश्चितता आणि जगभरातील वाढते भू-राजकीय तणाव हे त्यातील प्रमुख घटक आहेत.
याशिवाय जगभरातील अनेक केंद्रीय बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत आहेत. ही खरेदी सोन्याचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
सध्या अनेक गुंतवणूकदार सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांवर आगामी काही महिन्यांतील सोन्याची दिशा अवलंबून असेल. मात्र जेपी मॉर्गनचा अंदाज खरा ठरल्यास भारतीय बाजारात सोन्याचे दर नवीन विक्रम गाठू शकतात.