Global Tech Layoffs 2025 Job Cuts Amazon Meta Google Intel
तंत्रज्ञान क्षेत्र या वर्षी गंभीर संकटातून जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ऑटोमेशनमुळे कंपन्यांच्या कामाला वेग आला असला तरी याच तंत्रज्ञानामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीपासून ते भारतातील बंगळुरूपर्यंत टेक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचा धडाका सुरुच आहे.
‘Layoffs.fyi’ या डेटा प्लॅटफॉर्मनुसार, 2025 हे नोकर कपातीचं वर्ष ठरत आहे. आतापर्यंत 218 हून अधिक कंपन्यांनी एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.
या वर्षी सर्वात मोठी कपात अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने केली आहे. कंपनीने आपल्या जागतिक कर्मचार्यांपैकी जवळपास 22 टक्के म्हणजेच तब्बल 24,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अमेरिका, जर्मनी, पोलंड आणि कोस्टा रिका येथील कार्यालयांमध्ये ही कपात करण्यात आली आहे.
Amazonनेही मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. कंपनीने सुमारे 14,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कंपनीचे CEO अँडी जैसी यांनी सांगितले की, Amazon आता स्टार्टअपसारखं काम करणार आहे, म्हणजेच कमी खर्चात काम करणार आहे. या कपातीचा फटका प्रामुख्याने ऑपरेशन्स, HR आणि क्लाउड विभागांना बसणार आहे.
Microsoftने यंदा जवळपास 9,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. विशेषतः सॉफ्टवेअर आणि उत्पादन विभागात ही कपात झाली आहे. तर Google आणि Meta (Facebookची पॅरेंट कंपनी) यांनी आपल्या Android, हार्डवेअर आणि AI युनिट्समधील ओव्हरलॅपिंग नोकऱ्या संपवल्या आहेत, ज्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. Oracleनेदेखील अमेरिकेत शेकडो कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.
कर्मचारी कपातीची लाट आता भारतातही पोहोचली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आर्थिक वर्ष 2025 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत सुमारे 20,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कंपनीच्या इतिहासात ही सर्वात मोठी कपात मानली जाते. इतर आयटी कंपन्याही नवीन भरती करत नाहीत, कारण ऑटोमेशनमुळे मध्यम स्तरावरील नोकऱ्यांची गरज कमी होत आहे.
AI आणि ऑटोमेशन या दोन्ही गोष्टींमुळे कंपन्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढत आहे, पण याच वेगामुळे हजारो लोक रोजगार गमावत आहेत. सध्या ज्या वेगाने AI मानवी श्रमांची जागा घेत आहे, त्यावरून पुढील काही वर्षांत टेक सेक्टरमधील नोकऱ्यांचे भविष्य किती सुरक्षित राहील, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.