Fuel Price Hike Impact: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अलीकडेच प्रति लिटर ३ रुपयांची वाढ झाली आहे. इंधन महागलं की त्याचा परिणाम थेट आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो. घरगुती बजेटपासून किराणा, दूध, भाजीपाला, ऑनलाइन डिलिव्हरी आणि प्रवास खर्चापर्यंत अनेक गोष्टी महाग होऊ शकतात.
तज्ज्ञ आणि एफएमसीजी कंपन्यांनी याबाबत आधीच इशारा दिला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि वाढलेला वाहतूक खर्च यामुळे रोजच्या वापराच्या वस्तूंच्या किमती हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.
बिस्किटं, चिप्स, इंस्टंट नूडल्स, खाद्यतेल, पॅकेटबंद स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर एफएमसीजी उत्पादनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी मोठ्या वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतात. कंपन्यांच्या एकूण खर्चात लॉजिस्टिक्सचा हिस्सा साधारण ६ ते १० टक्के असतो. डिझेल महागलं की मालवाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम थेट उत्पादनांच्या किंमतीवर होऊ शकतो.
दुधाच्या दरवाढीचे संकेत आधीच दिसू लागले आहेत. अलीकडेच अमूल आणि मदर डेअरीसारख्या कंपन्यांनी दुधाच्या किमती प्रति लिटर २ रुपयांनी वाढवल्या आहेत. यामागे वाहतूक आणि ऑपरेशनल खर्च वाढल्याचं कारण सांगितलं जात आहे. दूध महागलं तर दही, ताक, लोणी, पनीर, चीज आणि आईस्क्रीम यांसारख्या उत्पादनांचे दरही वाढू शकतात.
भारतामधील अन्नपुरवठा साखळी मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतुकीवर अवलंबून आहे. भाजीपाला, फळं, धान्य, डाळी आणि इतर किराणा माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक वाहतूक वापरली जाते.
डिझेलचे दर वाढले की मालवाहतुकीचा खर्च वाढतो. अनेकदा हा वाढीव खर्च ग्राहकांवर टाकला जातो. त्यामुळे घरातील किचन बजेटवर महागाईचा ताण वाढू शकतो.
शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर, पाण्याचे पंप, कापणी यंत्रणा आणि वाहतूक साधनं मोठ्या प्रमाणावर डिझेलवर चालतात. डिझेल महागलं की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो.
याचा परिणाम पुढे अन्नधान्याच्या किमतीवर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, इंधनाचे दर दीर्घकाळ वाढलेले राहिले तर ग्रामीण भागावर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसू शकतो.
झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, अॅमेझॉन किंवा इतर कुरिअर कंपन्या मोठ्या लॉजिस्टिक्स नेटवर्कवर काम करतात. इंधन महागल्याने ‘लास्ट माईल डिलिव्हरी’चा खर्च वाढतो.
यामुळे डिलिव्हरी चार्ज वाढणे, सवलती कमी होणे, किमान ऑर्डर रक्कम वाढवणे किंवा अतिरिक्त सेवा शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे.
साबण, शॅम्पू, डिटर्जंट, साफसफाईची उत्पादने आणि इतर वैयक्तिक वापराच्या वस्तूंच्या किमतीतही वाढ होऊ शकते. एफएमसीजी कंपन्या अनेकदा अचानक मोठी दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने किंमत वाढवतात किंवा पॅकचा आकार कमी करतात. म्हणूनच इंधन महागल्याचा परिणाम हळूहळू घरातील छोट्या-मोठ्या खर्चावर दिसू शकतो.
टॅक्सी भाडे, बस प्रवास, कुरिअर सेवा आणि इतर वाहतूक संबंधित सेवांचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण इंधन हा या क्षेत्रातील सर्वात मोठा खर्च असतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम फक्त वाहन चालवणाऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. तो थेट प्रत्येक घराच्या बजेटवर परिणाम करतो. त्यामुळे पुढील काही काळात किराणा, दूध, प्रवास आणि ऑनलाइन सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.