या आठवड्यात परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला. (AI Image)
अर्थभान

Indian Stock Markets | सीमेवर तणाव, तरीही परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास, 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

पुढील काही आठवडे कशी राहील बाजाराची चाल?

दीपक दि. भांदिगरे

Foreign Portfolio Investors in Indian Stock Markets

मुंबई : सध्या भू-राजकीय तणाव असतानाही परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) भारतीय बाजारावरील विश्वास आबाधित ठेवला आहे. या आठवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात निव्वळ खरेदीदार म्हणून पुढे आले. त्यांनी या आठवड्यात १७,४२४.८८ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे एनएसडीएलने जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर वाढता तणाव असूनही, एफपीआयनी खरेदीवर जोर कायम ठेवला आहे.

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर एक मोठी भू-राजकीय चिंता निर्माण झाली. भारत- पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या परिस्थितीमुळे भारतीय बाजारांवर दबाव निर्माण झाला.

पुढील काही आठवडे बाजाराची चाल कशी असेल?

बँकिंग आणि बाजार तज्ज्ञ अजय बग्गा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, "पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली जात आहे. ही भू-राजकीय तणावाची परिस्थिती भारतीय बाजारावर परिणाम करणारी आहे. कार्पोरेट कंपन्यांची चांगली कमाई, परदेशी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि मजबूत जागतिक संकेतांदरम्यान टॅरिफ युद्धाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असतानाही काश्मीरमधील हल्ल्यानंतर भारतीय बाजारात घसरण झाली. या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवडे भारतीय बाजारावर दबाव राहू शकते."

भारतीय कंपन्यांची चांगली कमाई, परदेशी गुंतवणूकदारांचा मजबूत ओघ आणि संभाव्य टॅरिफ वाढीवर तोडगा निघण्याची शक्यता असतानाही पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय बाजारात घसरण झाली.

एप्रिलमधील निव्वळ FPI गुंतवणूक नकारात्मक पातळीवर...

गेल्या दोन आठवड्यांत परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली असली तरी, एप्रिलमधील निव्वळ एफपीआय गुंतवणूक नकारात्मक पातळीवर राहिली. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमधील निव्वळ गुंतवणूक ही ५,६७८ कोटी रुपये इतकी झाली. यावरून असे दिसून येते की अलीकडील काही दिवसांतील गुंतवणुकीचा ओघ हा महिन्याच्या सुरुवातीला काढून घेतलेल्या गुंतवणुकीची भरपाई करण्यासाठी पुरेसा नाही.

सीमेवरील तणावाचे बाजारावर सावट

२०२५ वर्षात आतापर्यंतचे चित्र पाहाता परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठी गुंतवणूक काढून घेतली. त्यांनी २०२५ पर्यंत १,२२,२५२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आणि कार्पोरेट कंपन्यांची मजबूत कमाई राहिली तरीही, सध्याच्या सीमेवरील तणावामुळे पुढील काही आठवडे भारतीय बाजारात दबाव कायम राहू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT