FASTag Rule Change from February 1: देशभरातील लाखो वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून FASTag वापरण्याशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलणार आहे, ज्यामुळे टोल प्लाझावर आणि FASTag अॅक्टिव्हेशनमध्ये होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार FASTagची ‘Know Your Vehicle’ (KYV) ही प्रक्रिया रद्द केली जाणार आहे. आतापर्यंत FASTag मिळाल्यानंतर वाहनाची पुन्हा-पुन्हा पडताळणी करावी लागत होती. या प्रक्रियेमुळे अनेकदा वैध कागदपत्रे असूनही टॅग अॅक्टिव्ह होण्यास उशीर होत असे.
FASTag घेतल्यानंतर वाहनचालकांना
– आरसी (Registration Certificate) पुन्हा अपलोड करावे लागत होते,
– वाहनाचे फोटो पाठवावे लागत होते,
– अनेकदा टॅग पुन्हा वेरिफाय करावा लागत होता.
या सगळ्यामुळे FASTag सुरू होण्यासाठी वेळ लागत होता आणि बँक व कस्टमर केअरच्या फेऱ्या वाढत होत्या. याच तक्रारी लक्षात घेऊन NHAI ने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता FASTag जारी करण्याची पूर्ण जबाबदारी बँकांवर असणार आहे. बँक FASTag देण्यापूर्वीच वाहनाची सर्व माहिती तपासेल. ही पडताळणी VAHAN डेटाबेसच्या माध्यमातून केली जाईल. जर VAHAN मध्ये माहिती उपलब्ध नसेल, तर आरसीच्या आधारे वाहनाची खात्री केली जाईल. याचा अर्थ असा की, FASTag एकदा अॅक्टिव्ह झाला की वेगळी KYV प्रक्रिया करावी लागणार नाही.
KYV म्हणजेच Know Your Vehicle ही प्रक्रिया टॅग चुकीच्या वाहनावर वापरला जात नाही ना, हे तपासण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया तांत्रिक अडचणी, उशीर आणि अनावश्यक त्रासाचं कारण ठरत होती. त्यामुळे NHAI ने ही अतिरिक्त प्रक्रिया काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
जे FASTag आधीच वापरात आहेत, त्यांच्यासाठीही दिलासा आहे. आता नियमितपणे KYV करण्याची गरज राहणार नाही. फक्त खालील परिस्थितीतच तपासणी होईल:
– टॅग चुकीच्या वाहनाशी जोडला गेल्याची तक्रार
– FASTag चा गैरवापर
– चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅग
या नव्या नियमामुळे
– FASTag घेण्यासाठी उशीर लागणार नाही
– टॅग घेताच लगेच वापरता येईल
– कागदपत्रांची झंझट कमी होईल
– टोल प्लाझावर लागणारा वेळ आणि वाद कमी होतील
थोडक्यात सांगायचं तर, FASTag वापरणं अधिक सोपं आणि जलद होणार आहे.