पुढारी ऑनलाईन डेस्क : आतापर्यंत देशातील सर्वात महागडा शेअर्स ( India's Most Expensive Stocks) टायर कंपनी एमआरएफचा (MRF) होता. पण आता एमआरएफ हा देशातील सर्वात महागडा शेअर्स राहिलेला नाही. कारण एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स (Elcid Investments Shares) हा सर्वात महागडा शेअर्स बनला आहे. एमआरएफचा शेअर्स आता सुमारे १.२२ लाख रुपयांवर आहे. तर एल्सिडच्या शेअर्सने २९ ऑक्टोबर रोजी २,३६,२५० रुपयांची पातळी गाठून देशातील सर्वात महागडा शेअर्सचा मान मिळवला.
सध्या बीएसईवर एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा शेअर्स २,३६,२५० रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअर्सने केवळ साडेतीन रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना लखपती बनवले आहे. या शेअर्सने मंगळवारी एका दिवसात ६६,९२,५३५ टक्के रिटर्न मिळवून दिला.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स शेअर्सने मंगळवारी सर्वांना आश्चर्यचकित केले. कारण या शेअर्सने २,३६,२५० रुपयांवर झेप घेतली. बीएसईने होल्डिंग कंपनीच्या प्राइस डिस्कवरीसाठी २८ ऑक्टोबर रोजी विशेष ऑक्शन सुरु केले. यादरम्यान एका दिवसात एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या केवळ साडेतीन रुपयांच्या शेअर्सने २.२५ लाखांची पातळी ओलांडून इतिहास रचला. २०११ पासून केवळ ३.५ रुपये प्रति शेअर किंमत असूनही एल्सिडचे बुक व्हॅल्यू ५,८५,२२५ रुपये इतके प्रभावी आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, जून २०२४ रोजी सेबीने एक सर्कुलर जारी केले होते. त्यातून इन्व्हेस्टमेंट कंपन्या आणि इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपन्यांची प्राइस डिस्कवरी सुधारण्यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला. सेबीने स्पेशल कॉल ऑक्शन फ्रेमवर्क सादर केले. सामान्यपणे शेअर्सना २ टक्के, ५ टक्के, १५ टक्के आणि २० टक्के असे सर्किट मर्यादा असते. म्हणजेच एखादा शेअर्स एका दिवसात एवढाच वाढू शकतो. पण स्पेशल कॉल ऑक्शनमध्ये कोणतीही मर्यादा ठेवली नव्हती.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सची आरबीआयकडे इन्व्हेस्टमेंट्स कंपन्यांच्या कॅटेगरीत रजिस्टर्ड एनबीएफसी म्हणून आहे. या कंपनीचा अद्याप कोणताही बिझनेस नाही. पण या कंपनीने एशियन पेंट्स सारख्या मोठ्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत डिव्हिडंट आहे.