Cibil Score Cheque Bounce: आपल्या पैकी अनेकांना प्रश्न पडतो की, “चेक बाउन्स झाला, तर सिबिल स्कोर कमी होतो का?” पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण प्रत्येक चेक बाउन्समुळे सिबिल स्कोर कमी होत नाही.
सिबिल स्कोर म्हणजे तुमच्या क्रेडिट शिस्तीचं आणि परतफेड क्षमतेचं मोजमाप असतं. हा तीन अंकी आकडा 300 ते 900 दरम्यान असतो. 750 किंवा त्याहून अधिक स्कोर असेल तर बँक सहज कर्ज देते आणि कमी व्याजदरात देते. पण 650 पेक्षा कमी स्कोर असल्यास कर्ज मिळणं अवघड होतं आणि व्याजदर वाढतो. म्हणून चांगला सिबिल स्कोर असणं अत्यंत आवश्यक आहे.
चेक बाउन्स झाला म्हणजे तुमच्या खात्यातून दिलेला चेक बँकेकडून क्लिअर न होणं. यामागे अनेक कारणं असू शकतात —
खात्यात पुरेसा बॅलन्स नसणे
सही जुळत नसणे
तारीख चुकीची असणे
रक्कम शब्दांत आणि आकड्यांत वेगळी असणे
चेक ओव्हरराइट किंवा एक्सपायर झालेला असणे
खाते बंद किंवा फ्रीझ असणे
कधी कधी बँकेच्या तांत्रिक त्रुटीमुळेही चेक बाउन्स होतो
या सगळ्या गोष्टींची नोंद सिबिलकडे थेट जात नाही. त्यामुळे केवळ चेक बाउन्स झाल्याने सिबिल स्कोर कमी होत नाही.
जर चेक बाउन्समुळे तुमचा ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट उशिरा झाले, तर बँक ती माहिती सिबिलला पाठवते. आणि तेव्हाच स्कोर कमी होतो. उदाहरणार्थ, तुम्ही कर्जाच्या हप्त्यासाठी चेक दिला आणि तो बाउन्स झाला, त्यामुळे हप्ता वेळेत भरला गेला नाही, तर सिबिल स्कोरवर परिणाम होतो.
पण जर हे एकदाच घडलं असेल, तर फारसा फरक पडत नाही. स्कोर 700–750 दरम्यान राहतो. पण वारंवार चेक बाउन्स आणि हप्ते उशिराने भरले, तर स्कोर पटकन घसरतो आणि भविष्यात कर्ज मिळवणं अवघड होतं.
चेक देण्यापूर्वी खात्यात पुरेसा बॅलन्स ठेवा — थोडा जास्त ठेवणं सुरक्षित.
चेकवरील तारीख, रक्कम आणि सही नीट तपासा; ओव्हरराइटिंग करू नका.
सही बदलली असल्यास बँकेला कळवा.
पोस्ट-डेटेड चेक देताना तारीख योग्य आहे का याची खात्री करा.
चेक स्वच्छ, कोरडा आणि स्पष्ट ठेवा.
चेक बाउन्स झाल्यास लगेच बँक आणि समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधा, त्वरित पेमेंट करा किंवा नवीन चेक द्या.
चेक बाउन्स झाल्याने सिबिल स्कोर थेट कमी होत नाही, पण त्यातून ईएमआय किंवा कर्जाचा हप्ता वेळेत न भरल्यास स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच चेक लिहिताना सावधगिरी बाळगा आणि तुमचा सिबिल स्कोर नेहमी चांगला ठेवा.