Diwali Muhurat Trading 2026 Pudhari
अर्थभान

Diwali Muhurat Trading 2026: दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंगची संधी! फक्त एक तास खुला राहणार शेअर बाजार; खरेदी-विक्रीची वेळ काय?

Diwali Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त 8 नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईमध्ये मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार एका तासासाठी खुला राहणार आहे.

Rahul Shelke

Diwali Muhurat Trading 2026: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दिवाळीचा दिवस खास असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर्स खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) येथे मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन केले जाते. यंदाही 8 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी-विक्रीची संधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, यंदा दिवाळी रविवारी आली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे शेअर बाजार बंद असला, तरी मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाजार काही वेळ खुला राहणार आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांमध्ये केवळ एका तासासाठी व्यवहार करता येतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

फक्त एका तासासाठी शेअर बाजार खुला

दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.20 ते 3.30 या वेळेत शेअर बाजार सुरू राहणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना या एका तासाच्या कालावधीत शेअर्सची खरेदी आणि विक्री करता येईल.

मुहूर्त ट्रेडिंगच्या आधी प्री-ओपन सत्र होईल. त्यानंतर मुख्य व्यवहारांना सुरुवात होईल. याशिवाय ब्लॉक डील आणि क्लोजिंग सत्रासाठीही स्वतंत्र वेळ आहे.

मुहूर्त ट्रेडिंगचे संपूर्ण वेळापत्रक

सत्र - वेळ

  • ब्लॉक डील - दुपारी 1.50 ते 2.05

  • प्री-ओपन सत्र - दुपारी 2.05 ते 2.20

  • मुहूर्त ट्रेडिंग - दुपारी 2.20 ते 3.30

  • क्लोजिंग सत्र (नॉन-CAS) - दुपारी 3.30 ते 3.50

  • क्लोजिंग सत्र (CAS) - दुपारी 3.35 ते 3.50

  • पोस्ट-क्लोजिंग सत्र - दुपारी 3.50 ते 4.00

10 नोव्हेंबरला शेअर बाजाराला सुट्टी

दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार सुरू राहणार आहे. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी सोमवारी शेअर बाजाराचे नियमित व्यवहार सुरू राहतील.

मात्र, 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांना सुट्टी असेल. याशिवाय 24 नोव्हेंबर रोजी प्रकाश गुरुपर्वानिमित्तही शेअर बाजार बंद राहणार आहेत.

सलग सातव्या दिवशी शेअर बाजारात तेजी

दिवाळीपूर्वीच भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. 6 नोव्हेंबर रोजी सलग सातव्या दिवशी बाजारात वाढ झाली.

या दिवशी निफ्टी 493.75 अंकांनी म्हणजेच 2.01 टक्क्यांनी वाढून 25,030 अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्समध्ये 1,718 अंकांची म्हणजेच 2.17 टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्स 81,028 अंकांवर बंद झाला.

त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर्स खरेदी करण्यापूर्वी कंपनीची आर्थिक स्थिती आणि गुंतवणुकीतील जोखीम समजून घ्या. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT