विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने नुकतेच काही महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत, ज्यामुळे पूर्वस्थितीतील आरोग्य विमा कवच अधिक सुस्पष्ट व ग्राहककेंद्री बनले आहे.
Health Insurance
इर्डाने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशांनुसार, आरोग्य विमा पॉलिसीधारकांना असणाऱ्या पूर्वस्थितीतील आजारांवर विमा संरक्षण मिळवण्याचे नियम आता स्पष्ट झाले आहेत. यासाठीचा प्रतीक्षा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, माहिती लपवण्याच्या बाबतीत योग्य तो न्यायनिवाडा सुनिश्चित केला आहे आणि विमा पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. त्यामुळे आरोग्य विमा घेताना लवकर निर्णय घेणे, खरी माहिती देणे आणि पॉलिसी सलगपणे चालू ठेवणे या गोष्टी आता अधिक महत्त्वाच्या ठरतील.
खासगी आरोग्य विम्याचे नियम आता बदलले असून, या बदलांमुळे ग्राहकांसाठी अधिक पारदर्शकता निर्माण झाली आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने नुकतेच काही महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत, ज्यामुळे पूर्वस्थितीतील आजारांवरील आरोग्य विमा कवच अधिक सुस्पष्ट व ग्राहककेंद्री बनले आहे.
पूर्वस्थितीतील आजार म्हणजे विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी निदान झालेली कोणतीही आरोग्यविषयक समस्या. अशा आजारांबाबत विमा कंपन्या काही मर्यादा घालतात. उदा. वाढीव प्रीमियम, प्रतीक्षा कालावधी किंवा मर्यादित कव्हरेज. मात्र, आता या प्रतीक्षा कालावधीवर थेट मर्यादा घालण्यात आली आहे.
नव्या नियमानुसार, पूर्वस्थितीतील आजार तसेच काही विशिष्ट आजारांवरील प्रतीक्षा कालावधी ३६ महिन्यांपर्यंतच (म्हणजेच जास्तीत जास्त तीन वर्षे) मर्यादित राहणार आहे. म्हणजेच, जर एखाद्या पॉलिसीधारकाने सलग ३६ महिने विमा कव्हरेज चालू ठेवले, तर त्याला पूर्वस्थितीतील आजारांवरही संरक्षण मिळेल. या प्रतीक्षा कालावधीत त्या संबंधित आजारांवरील खर्च व त्याच्याशी निगडित परिस्थितींसाठी विमा संरक्षण लागू होणार नाही. मात्र, इतर सर्व आजार व अपघातांवरील कव्हरेज चालू राहील. यामुळे ग्राहकांनी पॉलिसी घेतल्यानंतरही विमा संरक्षणात धोका राहणार नाही.
आणखी एक महत्त्वाचा नियमबदल म्हणजे जर ग्राहकाने सलग पाच वर्षे एकाच पॉलिसीचा लाभ घेतला आणि त्याच दरम्यान काही माहिती अनावधानाने लपवली असेल, तर विमा कंपनी त्यावर आधार घेत दाव्याला नकार देऊ शकणार नाही. यामुळे प्रामाणिक, पण अनावधानाने झालेल्या चुकांचे संरक्षण प्राप्त होणार आहे. या नव्या नियमामुळे ग्राहक व विमा कंपन्यांमध्ये विश्वासाचे नाते दृढ होण्यास मदत होणार आहे. पूर्वस्थितीतील आजारांसाठी विमा मिळवताना प्रीमियम थोडे जास्त असू शकतात. कारण विमा कंपन्या जोखीम मूल्यांकनानुसार प्रीमियम ठरवतात. साध्या जीवनशैलीशी निगडित आजारांसाठी (उदा. डायबेटीस) प्रीमियममध्ये थोडी वाढ होऊ शकते, तर गंभीर अवस्थेतील आजारांमध्ये काही मर्यादा घालून कव्हरेज दिले जाऊ शकते. मात्र, काही गंभीर आजारांसाठी पॉलिसी घेणे कठीण ठरू शकते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची खरी माहिती देणे अत्यावश्यक आहे. माहिती लपवल्यास पुढे दावा करताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
नवीन नियमांनुसार, ग्राहकांनी जर एका विमा कंपनीकडून दुसऱ्याकडे पॉलिसी स्थानांतरीत किंवा पोर्ट केली, तर त्यांनी आधी पूर्ण केलेला प्रतीक्षा कालावधी नव्या पॉलिसीतही ग्राह्य धरला जाईल. म्हणजेच, ग्राहकांना सुरुवातीपासून प्रतीक्षा कालावधी पुन्हा सुरू करण्याची गरज राहणार नाही. यामुळे पॉलिसी हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व फायद्याची ठरणार आहे.