Credit Card Late Payment Charges pudhari
अर्थभान

Credit Card Late Payment Charges: क्रेडिट कार्ड वापरताय... ही बातमी तुमच्यासाठी! ४६ पैशाच्या नादात १२०० रूपयांचा लागला चुना

Anirudha Sankpal

Credit Card Late Payment Charges: क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एचडीएफसी (HDFC) बँकेच्या एका क्रेडिट कार्डधारकाने सोशल मीडियावर दावा केला आहे की, त्याने १०,६४९.४६ रुपयांच्या एकूण बिलापैकी १०,६४९ रुपये भरले होते. मात्र, केवळ ४६ पैसे थकीत राहिल्यामुळे बँकेने त्याच्या खात्यावर १,२०० रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त शुल्क आकारले. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियम काय सांगतात?

व्याज आकारणी: ग्राहकाने दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण बिल न भरल्यास 'व्याजमुक्त कालावधी' (Interest-free period) संपुष्टात येतो. मात्र, आरबीआयच्या नियमांनुसार व्याज हे संपूर्ण बिलावर न लावता केवळ शिल्लक थकीत रक्कमेवरच आकारले गेले पाहिजे.

लेट पेमेंट फी (विलंब शुल्क): बिल भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतर ३ दिवसांपेक्षा जास्त काळ रक्कम थकीत राहिल्यासच बँक विलंब शुल्क किंवा दंडात्मक कारवाई करू शकते. हे शुल्कही एकूण बिलावर नसावे.

बिलातील स्पष्टता: बँकांनी बिलामध्ये मिनिमम अमाउंट ड्यु आणि शिल्लक रक्कम यातील फरक स्पष्टपणे दाखवणे बंधनकारक आहे.

काही पैशांच्या तुटीवर लगेच दंड लागतो का?

तज्ज्ञांच्या मते, काही पैशांच्या किंवा अत्यंत लहान फरकामुळे प्रणाली लगेचच दंड आकारत नाही. 'नोव्हिओ'चे (Novio) संस्थापक आदित्य गुप्ता यांच्या मते, अशा किरकोळ फरकाला सहसा अपूर्ण पेमेंट मानले जात नाही आणि त्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. मात्र, याची अचूक मर्यादा प्रत्येक बँकेच्या धोरणावर अवलंबून असते.

बिलात अचानक मोठे अतिरिक्त शुल्क दिसल्यास ग्राहकांनी बिलाचा सविस्तर तपशील (Breakup) तपासून पाहावा आणि गरज पडल्यास बँकेशी त्वरित संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT