BSE Sensex
सेन्सेक्स आज ७३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८०,४२९ वर बंद झाला. file photo
अर्थभान

Closing Bell | बजेटदरम्यान कोसळलेला बाजार सावरला! सेन्सेक्स- निफ्टी सपाट बंद

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान (Budget 2024) मंगळवारी (दि.२३) भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना कोसळलेला बाजार नंतर लगेच सावरला. (Stock Market Closing Bell) दुपारी साडेबाराच्या दरम्यान सुमारे १,२७८ अंकांनी कोसळलेल्या सेन्सेक्सने (Sensex) नंतर जोरदार रिकव्हरी केली. सेन्सेक्स ७३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८०,४२९ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ३० अंकांनी घसरून २४,४७९ वर स्थिरावला. Nifty Bank ५०२ अंकांनी घसरला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि.२३) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेंगमेंटवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टी घसरले होते.

सिक्युरिटीजमधील ऑप्शनच्या विक्रीवर एसटीटीचा दर ऑप्शन प्रीमियमच्या ०.०६२५ टक्क्यांवरून ०.१ टक्क्यांपर्यंत आणि सिक्युरिटीजमधील फ्युचर्सच्या विक्रीवर ०.०१२५ टक्क्यांवरून ०.०२ टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित आहे,” असे सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. या निर्णयाचे शेअर बाजारात पडसाद उमटले.

क्षेत्रीय निर्देशांकांत कोण आघाडीवर?

क्षेत्रीय निर्देशांकात एफएमसीजी, हेल्थकेअर, मीडिया आणि आयटी ०.५ ते २.५ टक्क्यांनी वाढले. तर बँक, कॅपिटल गुड्स, मेटल, ऑईल आणि गॅस, रियल्टी १ ते २ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.७ टक्क्यांनी घसरला. स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला.

कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

सेन्सेक्सवर एलटी, बजाज फायनान्स, एसबीआय, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर टायटन आणि आयटीसी हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. हे दोन्ही शेअर्स अनुक्रमे ६ टक्क्यांनी वाढले. अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, इन्फोसिस, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्सवरील शेअर्स.

निफ्टी आज २४,५६८ वर खुला झाला होता. आजच्या ट्रेडिंग सत्रात तो २४ हजारपर्यंत खाली आला. त्यानंतर तो ३० अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,४७९ वर बंद झाला. निफ्टीवर एलटी, हिंदाल्को, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, ओएनजीसी हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी घसरले. तर टायटन, आयटीसी, टाटा कन्झ्यूमर, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स हे शेअर्स २ ते ६ टक्क्यापर्यंत वाढले.

निफ्टी ५० चा ट्रेंडिग आलेख.
SCROLL FOR NEXT