Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारीपासून सिगारेटवर नवी एक्साइज ड्युटी लागू करण्यात येणार असून त्यामुळे सिगारेटच्या किंमती वाढणार आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम देशभरातील कोट्यवधी सिगारेट ओढणाऱ्यांवर होणार आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, सिगारेटच्या लांबीप्रमाणे नव्या एक्साइज ड्युटीचे दर ठरवण्यात आले आहेत. ही ड्युटी प्रति हजार सिगारेट्समागे किमान 2,050 रुपयांपासून ते थेट 8,500 रुपयांपर्यंत असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कर सध्या लागू असलेल्या 40 टक्के जीएसटीव्यतिरिक्त आकारला जाणार आहे.
सध्या भारतात सिगारेटवर एकूण कर सुमारे 53 टक्के आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार सिगारेटवर किमान 75 टक्के कर असायला हवा. हा फरक कमी करण्यासाठीच सरकारने नवी एक्साइज ड्युटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्या ₹18 ला मिळणाऱ्या एका सिगरेटची किंमत ₹72 पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
डिसेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने सेंट्रल एक्साइज अमेंडमेंट बिल 2025 ला मंजुरी दिली होती. या कायद्यानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांवरील तात्पुरता कर रद्द करून कायमस्वरूपी कररचना लागू करण्यात आली. त्याच कायद्याअंतर्गत आता ही नवी एक्साइज ड्युटी आकारली जाणार आहे.
या निर्णयामुळे सिगारेटच्या किंमती वाढणार असून त्यामुळे तंबाखूच्या वापरात घट होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. सिगारेटमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे, हाच या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
दरम्यान, या करवाढीचा परिणाम सिगारेट उत्पादक कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे. आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया यांसारख्या कंपन्यांच्या विक्री आणि नफ्यावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एकूणच, सिगारेट महाग झाल्याने धूम्रपान करणाऱ्यांचा खर्च वाढणार असून, त्याचवेळी तंबाखू सेवन कमी होऊन आरोग्यास फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.