Parliament e-cigarette controversy | ई-सिगारेटचा धूर लोकसभेत!

Parliament e-cigarette controversy
Parliament e-cigarette controversy | ई-सिगारेटचा धूर लोकसभेत!Pudhari File Photo
Published on
Updated on

विश्वास सरदेशमुख

सध्या ई-सिगारेट पुन्हा चर्चेत आली आहे. केंद्र सरकारने 2019 मध्ये ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी घातली आणि ई सिगारेटची खरेदी, विक्री, बाळगण्यासंदर्भात कायद्याने मनाई करण्यात आली. कठोर कायदा केला तरीही देशात ई सिगारेट वापरणार्‍यांची संख्या कमी नाही, हे वास्तव आहे.

धूम्रपान करणार्‍यांची संख्या जगात फार मोठी आहे. भारतातही सर्व स्तरांमध्ये धूम्रपान करणार्‍या व्यक्ती मोठ्या संख्येने दिसतात. सिगारेटच्या पाकिटावर कितीही मोठ्या अक्षरांमध्ये ‘वैधानिक इशारा’ छापला किंवा कर्करोगाची आठवण करून देणारी भलीमोठी चित्रे छापली, तरी धूम्रपान करणार्‍यांच्या संख्येत किंवा प्रमाणात फारसा बदल होत नाही. उलट धूम्रपानाच्या शौकिनांची संख्या वाढतच असताना दिसते. सिगारेट ओढण्याची इच्छा कमी व्हावी आणि व्यसन सुटावे म्हणून काही उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. विशिष्ट प्रकारच्या गोळ्याही धूम्रपानाची सवय कमी करू शकतात, असा दावा केला जातो. धूम्रपानाची सवय म्हणजे निकोटिन या घातक पदार्थाची शरीराला लागलेली सवय होय. शरीराकडून केली जाणारी निकोटिनची मागणी कमी करण्यासाठी या गोळ्या किंवा उत्पादने वापरली जातात. अशाच प्रकारचे ‘ई-सिगारेट’ नावाचे उपकरण काही वर्षांपूर्वी आविष्कृत झाले होते.

अलीकडेच संसद परिसरात एक खासदार ई-सिगारेटचे सेवन करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे खासदार अनुराग ठाकर यांनी लोकसभेत केला. संसदेचे कामकाज सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराला ई-सिगारेट ओढताना पाहिल्याचा दावा त्यांनी केला आहे. या खासदाराची छायाचित्रेही व्हायरल झाली असून त्यावरून बराच गदारोळ उठला आहे. त्यावरून संसदेत अशा प्रकारच्या कृतीला मान्यता आहे का, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला. अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच गदारोळ उडाला. यासंदर्भात ठाकूर यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले. संसद परिसरात ई-सिगारेट ओढण्याची परवानगी आहे का, यावर अध्यक्षांनी नकारार्थी उत्तर दिले. कोणत्याच सदस्याला अशा प्रकारची कृती करण्याची मुभा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उत्तरानंतर सभागृहातील आणखीच वातावरण गंभीर झाले. शेवटी खासदार ठाकूर यांनी संबंधित खासदारावर कारवाई करण्याची मागणी केली. ते खासदार दुसरे तिसरे कोणी नसून तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय होय. अनुराग ठाकूर यांनी त्यांना संसद परिसरात ई- सिगारेटचा धूर सोडताना पाहिले. भाजप नेत्यांनी त्यांना हटकल्यानंतर सौगत राय यांनी दिल्लीच्या प्रदूषित वातावरणात सिगारेट ओढण्याच्या कृतीचे समर्थन केले. ते म्हणाले, तुम्ही लोकांनी दिल्लीची काय अवस्था केली आहे ते आधी पाहा! राजधानीत श्वास घेणे म्हणजे 25 सिगारेट ओढण्यासारखे आहे, असे म्हणत त्यांनी ई-सिगारेटच्या कृतीला योग्य ठरविले; पण केंद्रीय मंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास मनाई असल्याचे सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले आणि तेथून निघून गेले.

यानिमित्ताने ई-सिगारेट ही सामान्य सिगारेटच्या तुलनेत किती धोकादायक असते? भारतात यावर कधी बंदी घातली आणि त्याचे सेवन केल्यानंतर किंवा विक्री केल्याप्रकरणी देण्यात येणार्‍या शिक्षेची तरतूद काय आहे, असे प्रश्न निर्माण होतात. सध्या बाजारात असलेली ई-सिगारेट म्हणजे द्रवरूप निकोटिन, प्रॉपिलीन ग्लाइकोल, पाणी, ग्लिसरीन आणि कृत्रिम स्वादांच्या मदतीने सिगारेट ओढल्यासारखा अनुभव देणारे उपकरण होय. हे उपकरण बॅटरीद्वारे संचालित केले जाते. आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी या सिगारेट तयार करणार्‍या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या टोबॅको इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निकोटिनचे सेवन करण्याची पद्धत म्हणजे ई-सिगारेट होय. या प्रक्रियेला इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम (ईएनडीएस) म्हणतात. जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे या प्रकारच्या तंबाखू सेवनात वाढ झाली आहे, तशीच अलीकडच्या काळात भारतातही ई-सिगारेटचा वापर करणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ई-सिगारेट हे सिगार किंवा पाईपच्या आकाराचे एक उपकरण आहे. तंबाखूच्या धुरामुळे मिळणारा स्वाद आणि अनुभूती देण्याचा हा एक कृत्रिम प्रयत्न आहे. या उपकरणाचा आंतर्भाग लांबट नळीप्रमाणे असतो, तर बाह्यस्वरूप इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या आकाराप्रमाणे म्हणजेच सिगारेट, सिगार किंवा पाईपसारखा असतो. ई-सिगार वारंवार वापरता येते. त्याचे सुटे भाग बदलता येऊ शकतात. चिनी फार्मासिस्ट होन लिक याने 2003 मध्ये ई-सिगारेटचा शोध लावला आणि 2004 मध्ये ई-सिगारेट बाजारात दाखल झाली. गोल्डन ड्रॅगन होल्डिंग्ज या होन लिक यांच्या कंपनीने 2005 आणि 2006 मध्ये या ई-सिगारेटची विक्री जागतिक पातळीवर सुरू केली. या उपकरणाचे नाव ‘रूयान’ असे ठेवण्यात आले. ‘धूम्रपानासारखेच’ असा या शब्दाचा अर्थ होतो. ई-सिगारेटचा झुरका जेव्हा एखादी व्यक्ती घेते, तेव्हा आत बसविलेला एक सेन्सर हा प्रवाह सेन्स करतो आणि या उपकरणातील उष्णता वाढविणारा भाग सक्रिय करतो. यामुळे ‘माऊथपीस’ किंवा ‘कार्ट्रिज’मध्ये असलेल्या निकोटिनयुक्त द्रवपदार्थाचे बाष्पीभवन होते. त्यामुळे या झुरक्याची अनुभूती सामान्य सिगारेटच्या झुरक्याप्रमाणेच होते. झुरका घेण्यापूर्वी व्यक्तीला या उपकरणाच्या उष्णता वाढविणारा भाग सक्रिय करण्यासाठी एक बटण दाबावे लागते. अशा प्रकारच्या बहुतांश ई-सिगारेटच्या विरुद्ध टोकावर एक छोटा एलईडी दिवाही बसविलेला असतो. झुरका घेताना तोही सक्रिय होतो आणि सामान्य सिगारेटच्या पुढील भागातील फुललेल्या निखार्‍याप्रमाणेच तो दिसतो. त्यामुळे सिगारेट ओढल्याची पूर्ण अनुभूती व्यक्तीला मिळते.

वास्तविक, ई-सिगारेटपासून बाहेर पडणार्‍या धुरामुळे अनेक आजार बळावू शकतात आणि त्यातील विषाक्त घटक शरीरातील कोणत्याही भागावर अचानक दुष्परिणाम करू शकतात. ई-सिगारेटमध्ये निकोटीन असते आणि निव्वळ निकोटिनचे सेवन केले, तर कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो. त्यात फार्मेल्डिहाईड, जड धातू आणि बेजिंनसारखे तत्त्वे असतात आणि ती कर्करोगाला पोषक असतात. ई-सिगारेटच्या तरल पदार्थात ग्लायकोजेन आणि निकोटीन आढळून येते आणि तो पदार्थ विषाक्त आहे.

सिगारेट ओढण्याची सवय कमी करण्यासाठी ई-सिगारेट हा एक तर्कसंगत उपाय असल्याचे 2008 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. उत्पादकांचाही तसाच दावा राहिला आहे. कारण, कंपन्यांच्या मते, नेहमीच्या सिगारेटमध्ये तंबाखूचे दहन होऊन उत्पन्न होणारे घातक पदार्थ ई-सिगारेटमधील द्रव पदार्थाच्या बाष्पात नसतात. कर्करोगास निमंत्रण देणारे घातक पदार्थ ई-सिगारेटमध्ये नसल्यामुळे ती सुरक्षित असल्याचा दावा कंपन्या करतात; मात्र तरीही ई-सिगारेटच्या वेष्टनावर ‘वैधानिक इशारा’ छापलेला असतोच. कारण, त्यात निकोटिन हा घातक पदार्थ अस्तित्वात असतो. यामुळेच सध्या सुमारे 37 देशांत ई-सिगारेटवर बंदी आहे. यात भारताचा समावेश आहे. केंद्र सरकारने 2019 मध्ये ई -सिगारेटमध्ये संपूर्णपणे बंदी घातली आणि ई-सिगारेटचे सेवन करणे, बाळगणे आणि त्याची विक्री करणे कायद्याने बेकायदा ठरविण्यात आले. अशाप्रकारच्या गुन्ह्यातील दोषीला एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच दुसर्‍यांदा दोषी आढळून आल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंडही आकारण्याची तरतूद केली आहे. असे असताना एखादा खासदार थेट लोकसभा परिसरामध्ये ई-सिगारेटचे सेवन करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा त्यातून समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. खरे पाहता, लोकशाहीची मूल्य संस्कृती जपण्यासाठी सदर महाशयांनी राजीनामाच द्यायला हवा, इतका हा गंभीर प्रकार आहे; परंतु ‘सभागृहात धूम्रपान करण्यास मनाई आहे. सभागृहाबाहेर धूम्रपान करण्यावर कोणतंही बंधन नाही’ अशी मखलाशी सदर खासदारांनी केली आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे नीतिमत्ता, आदर्श, सार्वजनिक जीवनातील स्वयंशिस्त यांसारखी मूल्ये सिगारेटच्या धुराप्रमाणे हवेत उडून जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news