Banks Open on September 27 Sunday Pudhari
अर्थभान

Banks Open on Sunday: 27 सप्टेंबरला रविवार असूनही बँका उघडणार; सरकारने घेतला मोठा निर्णय, काय आहे कारण?

Banks Open on September 27 Sunday: 27 सप्टेंबर 2026 रोजी रविवार असूनही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू राहणार आहेत.

Rahul Shelke

Banks Open on September 27 Sunday: बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) नियमितपणे सुरू राहणार आहेत. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 27 सप्टेंबर रोजी सर्व बँक शाखा, कार्यालये, ATM-संलग्न शाखा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रविवारी बँकिंग सेवा सुरु असणार आहेत.

बँक संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) 28 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान देशव्यापी तीन दिवसांचा संप पुकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यापूर्वी 26 आणि 27 सप्टेंबरला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने बँकिंग सेवा अनेक दिवस बंद होण्याची शक्यता होती.

यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये आणि महत्त्वाच्या बँकिंग सेवा सुरळीत सुरू राहाव्यात, यासाठी सरकारने 27 सप्टेंबरला बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, नागरिकांच्या बँकिंग गरजांवर दीर्घकाळ परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांची सोय आणि हित सरकारच्या प्राधान्यक्रमात असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

SBI, Bank of Baroda आणि Canara Bankचे आवाहन

प्रस्तावित संपाच्या पार्श्वभूमीवर State Bank of India (SBI), Bank of Baroda आणि Canara Bank यांनी ग्राहकांना महत्त्वाची कामे शक्य असल्यास आधीच पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. संपाच्या कालावधीत ग्राहकांनी डिजिटल बँकिंग आणि सेल्फ-सर्व्हिस सुविधांचा वापर करावा, असेही बँकांकडून सांगण्यात आले आहे.

सलग पाच दिवस बँका बंद राहणार होत्या?

26 आणि 27 सप्टेंबरला शनिवार-रविवारची सुट्टी आहे. त्यानंतर 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान प्रस्तावित संप असल्याने बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता होती.

पाच दिवसांचा आठवडा करा ही प्रमुख मागणी

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून (UFBU) बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. सरकार आणि बँक व्यवस्थापनाने कर्मचारी संघटनांना प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे 27 सप्टेंबरला रविवार असूनही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू राहणार आहेत. मात्र 28 ते 30 सप्टेंबरच्या प्रस्तावित संपामुळे बँकिंग सेवांवर काय परिणाम होतो, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT