August 1 Rule Changes 2026: जुलै महिना संपत असून 1 ऑगस्ट 2026 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर, बँकिंग व्यवहारांवर, प्रवासावर आणि आर्थिक नियोजनावर होणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंगपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती, आयकर रिटर्न, क्रेडिट कार्डचे नियम आणि आधारशी संबंधित KYC प्रक्रियेपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत.
नवीन महिन्याची सुरुवात करण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा दंड किंवा इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
1 ऑगस्टपासून भारतीय रेल्वेने तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला आहे. नव्या नियमानुसार तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या वेळेलाच टोकन वितरणाची प्रक्रिया सुरू होईल.
यामुळे आरक्षण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यापूर्वी टोकन घेण्यासाठी आणि तिकीट काढण्यासाठी वेगवेगळ्या वेळेला केंद्रावर जावे लागत होते. नव्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि तिकीट बुकिंग अधिक सुलभ होईल.
आर्थिक वर्ष 2026-27 साठी ITR-1 आणि ITR-2 भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 होती. ज्यांनी या मुदतीपर्यंत आयकर विवरणपत्र (ITR) भरले नसेल, त्यांना आता विलंब शुल्क भरावे लागू शकते.
तसेच, उशिरा रिटर्न भरल्यास काही करसवलतींचा लाभ किंवा विशिष्ट कर प्रणालीची निवड करण्यावरही परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, ITR-3 आणि ITR-4 (ज्या प्रकरणांमध्ये ऑडिट आवश्यक नाही) भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. ऑडिट आवश्यक असलेल्या प्रकरणांसाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 ठेवण्यात आली आहे.
1 ऑगस्टपासून अनेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्डच्या अटी व नियमांमध्ये बदल करू शकतात. यामध्ये रिवॉर्ड पॉइंट्स, वार्षिक शुल्क, सेवा शुल्क आणि इतर सुविधांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही बँका मुदत ठेवींच्या (FD) व्याजदरांमध्येही बदल करू शकतात.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दराबाबत निर्णय झाल्यास त्याचा परिणाम कर्जावरील EMI आणि FD वरील व्याजदरांवरही होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेकडून जारी होणाऱ्या नव्या अटी तपासणे आवश्यक आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करतात. 1 ऑगस्ट 2026 रोजीही एलपीजीच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीतील चढ-उतार लक्षात घेऊन नवीन दर निश्चित केले जातात. त्यामुळे सिलिंडर महागल्यास स्वयंपाकघराचा खर्च वाढू शकतो, तर दर कमी झाल्यास ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.
1 ऑगस्टपासून ग्राहक ओळख पडताळणी (KYC) प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल होणार आहे. बँका, विमा कंपन्या आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या Central Know Your Customer (CKYC) 2.0 प्रणाली लागू करणार आहेत.
या नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकाच्या संमतीनंतर संबंधित संस्थांना KYCची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होईल आणि फसवणूक रोखण्यासही मदत होईल.
1 ऑगस्टपासून लागू होणारे हे बदल थेट आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणारे, आयकर भरणारे, क्रेडिट कार्ड वापरणारे, मुदत ठेवी करणारे, एलपीजी वापरणारे आणि बँकिंग सेवा घेणाऱ्या प्रत्येकाने या नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे. वेळेत माहिती घेतल्यास अनावश्यक दंड, अतिरिक्त शुल्क आणि इतर अडचणी टाळता येतील.