Apple Pay India launch
नवी दिल्ली : अॅपलने अखेर भारतात Apple Pay सेवा सुरू केली असून, आयफोन वापरकर्त्यांना आता स्टोअर, अॅप्स आणि वेबसाइटवर कार्डद्वारे पेमेंट करण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात ही सुविधा सर्व कार्डांसाठी उपलब्ध नसून अॅक्सिस बँकेच्या पात्र व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्डांपुरती मर्यादित आहे.
सध्या Apple Pay वर अॅक्सिस बँकेने जारी केलेली पात्र व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्डे जोडता येणार आहेत. अॅपल पेची सुविधा देणारी अॅक्सिस बँक ही भारतातील पहिली बँक ठरली आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह इतर प्रमुख भारतीय बँकांशीही अॅपलची चर्चा सुरू होती; मात्र सेवा सुरू होताना त्यांच्याशी करार अंतिम झालेला नव्हता. सध्या अॅपल पेवर पात्र अॅक्सिस बँकेच्या व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्डच चालतील. RuPay कार्डांना सध्या सपोर्ट नाही.
भारतामध्ये Apple Pay ची सुरुवात कार्ड आधारित पेमेंट सेवेच्या स्वरूपात झाली आहे. त्यामुळे ती सध्या UPIचा पर्याय म्हणून काम करणार नाही. अॅपल च्या माहितीनुसार, पात्र कार्डांचा वापर स्टोअर, अॅप्स आणि ऑनलाइन वेबसाइटवर खरेदीसाठी करता येईल. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या अॅपल पे सेवेत UPIचा समावेश करण्यात आलेला नाही. भारतामध्ये सुरुवातीला आयफोन, आयपॅड आणि अॅपल वॉचवर Apple Pay उपलब्ध आहे. मॅकसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे अॅपलने म्हटले आहे.
पात्र ग्राहक अॅपल वॉलेटमधून आपले कार्ड जोडू शकतात. अॅक्सिस बँकेने आपल्या मोबाइल बँकिंग अॅपमधूनही पात्र कार्ड अॅपल पेमध्ये जोडण्याची सुविधा दिली आहे. यासाठी वॉलेट अॅप उघडून कार्ड जोडण्याचा पर्याय निवडा आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करा. कार्ड जारी करणारी बँक अतिरिक्त पडताळणी मागू शकते. यामध्ये एसएमएस, ई-मेल, फोन कॉल किंवा बँकेच्या अॅपद्वारे पडताळणीचा समावेश असू शकतो. कार्ड जोडताना “Could Not Add Card” किंवा “Invalid Card” असा संदेश दिसल्यास कार्ड जारी करणाऱ्या बँकेशी संपर्क साधण्याचा सल्ला अॅपलने दिला आहे.
अॅपलच्या माहितीनुसार, भारतातील सहभागी व्यापाऱ्यांच्या स्टोअर, अॅप्स आणि वेबसाइटवर अॅपल पे वापरता येईल. प्रत्यक्ष दुकानात पेमेंट करण्यासाठी संबंधित मशीनमध्ये कॉन्टॅक्टलेस/एनएफसी पेमेंटची सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच व्यापाऱ्याने वापरले जाणारे कार्ड आणि पेमेंट नेटवर्क स्वीकारणेही गरजेचे आहे. सुरुवातीला, ॲपलने ॲपल स्टोअरची ठिकाणे, ब्लिंकइट, क्रोमा, इक्सिगो, टाटा १एमजी आणि झोमॅटो यांसारख्या व्यापाऱ्यांची यादी दिली आहे. आगामी काळात आणखी व्यापारी आणि अॅप्स या सेवेशी जोडले जाण्याची शक्यता आहे.
अॅपल पेच्या माध्यमातून पेमेंट करताना प्रत्येक वेळी कार्डचा PIN किंवा OTP टाकण्याची गरज नसते. फेस आयडी, टच आयडी किंवा डिव्हाइसच्या पासकोडद्वारे पेमेंट करता येते. Appleच्या म्हणण्यानुसार, अॅपल पे वापरताना तुमचा प्रत्यक्ष कार्ड क्रमांक व्यापाऱ्यासोबत शेअर केला जात नाही. त्याऐवजी डिव्हाइस अकाउंट नंबर आणि प्रत्येक व्यवहारासाठी स्वतंत्र सुरक्षा कोड वापरला जातो. पेमेंटची माहिती पाठवण्यापूर्वी वापरकर्त्याची ओळखही पडताळली जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी फोन टॅप केल्यावर तुमच्या प्रत्यक्ष कार्डचा क्रमांक दुकानाला पाठवला जात नाही.
आयफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो तातडीने Lost Modeमध्ये टाकावा. अॅपलच्या माहितीनुसार, डिव्हाइस Lost Modeमध्ये टाकल्यास त्या डिव्हाइसवरील अॅपल पे आपोआप बंद होते. आयफोनमध्ये Stolen Device Protection ही सुविधाही उपलब्ध आहे. फोन नेहमीच्या ठिकाणापासून दूर असल्यास संवेदनशील सेटिंग्ज किंवा कृतींसाठी अतिरिक्त सुरक्षा पडताळणी आवश्यक असते.