Ankur Warikoo driver salary: कंटेंट क्रिएटर अंकुर वारिकू यांनी त्यांच्या ड्रायव्हर दयानंद यांच्या 13 वर्षांच्या निष्ठावान सेवेबद्दल सोशल मिडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी सांगितले की, दयानंद यांना आता महिन्याला ₹ 53,350 पगार मिळतो, म्हणजे वर्षाला सुमारे ₹ 6 लाख. यासोबतच त्यांना इन्श्युरन्स, दिवाळी बोनस आणि एक स्कूटीही भेट देण्यात आली आहे.
अंकुर म्हणाले की जेव्हा दयानंद यांनी त्यांच्या कुटुंबासोबत काम सुरू केले, तेव्हा त्यांचा पगार फक्त ₹ 15,000 होता. पण त्यांनी मेहनत केली, कुटुंबाचा विश्वास जिंकला आणि आज ते कुटुंबाचा एक भाग आहेत. दयानंद यांचे तीनही मुलं आज चांगली नोकरी करत आहेत, लग्न करून स्वतःचे कुटुंब संभाळत आहेत, असं वारिकू यांनी सांगितलं.
वारिकू म्हणाले, दयानंद यांची जीवनशैली खूप चांगली आहे. ते सकाळी 4:30 वाजता उठतात, रात्री 8:30 वाजता झोपतात आणि कामावर यायला कधी उशीर करत नाहीत. नेहमी हसमुख आणि जबाबदारीने काम करतात. त्यांनी असंही सांगितलं की, दयानंद फक्त ड्रायव्हर नाहीत ते घरातील ट्रिप्स, मुलांना शाळेत पोहोचवणं, घराच्या चाव्या ठेवणं, ATM पिन माहित असणं, गरजेचं काम हँडल करणं ही सगळी जबाबदारी ते पार पाडतात.
वारिकू म्हणाले की, येत्या 5-6 वर्षांत दयानंद यांचा महिन्याचा पगार ₹ 1 लाखांपर्यंत वाढू शकतो. सोशल मिडियावरील या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका युजरने लिहिलेः “हे वाचून मनाला खरंच शांती मिळाली. अशा व्यक्तीला योग्य सन्मान मिळणं हे फारच चांगलं आहे.”
दुसऱ्या युजरने लिहिलं: “आपण त्यांना फक्त कर्मचारी म्हणून नाही तर सहकारी म्हणून सगळं दिलं. कर्मचार्यांना योग्य सन्मान दिला पाहिजे.” वारिकू आणि दयानंद यांचे हे नाते अनेकांसाठी प्रेरणा ठरू शकते.