पुढारी ऑनलाईन डेस्क : अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या रिलायन्स एनर्जी पॉवर या कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (SECI) बनावट बँक गॅरंटी देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यानंतर SECIने रिलायन्स पॉवर आणि तिची उपकंपनी रिलायन्स NU BESSला टेंडर प्रक्रियेत भाग घेण्यापासून बंदी घातली आहे. ही बंदी ३ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. SECI च्या वतीने २००० मॅगवॅट क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम उभी करायची आहे. त्यासाठी रिलायन्स NU BESS ने टेंडर भरले होते. पण हे टेंडर भरताना दिलेली बँक गॅरंटी ही बनावट असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यानंतर SECIने या कंपनीवर तसेच रिलायन्स पॉवर या कंपनीवर निर्बंध लादल्याची घोषणा गुरुवारी केली.
SECIचे म्हणणे असे आहे की, "या कंपनीने टेंडरच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे भविष्यातील टेंडर प्रक्रियेत कंपनीला भाग घेण्यास बंदी घातली आहे. या टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक क्षमता रिलायन्स NU BESSला मातृ कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवरकडून मिळाली होती. त्यामुळे रिलायन्स NU BESS कंपनीने घेतलेले धोरणात्मक निर्णय हे मूलतः मातृ कंपनीचे होते. त्यामुळे रिलायन्स पॉवर लिमिटेड या कंपनीवरही भविष्यातील टेंडर प्रक्रियेत भाग घेण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
रिलायन्स पॉवर लिमिटिडेने हा निर्णय अनुचित असल्याचे म्हटले आहे, तसेच कंपनी या निर्णयाला आव्हान देणार आहे. "रिलायन्स पॉवर आणि त्याच्या सहकंपनीने प्रामाणिक काम केले आहे. आमची कंपनीच धोक्याचा बळी ठरली आहे." कथित बनावट बँक गॅरंटीची व्यवस्था करणाऱ्या संस्थेविरोधात १६ ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार दिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.