Nashik Fraud News | बेरोजगारांच्या नावे बँक खाते उघडत परस्पर तब्बल १०० काेटींचे व्यवहार

मालेगावातील गंभीर प्रकार : फसवणूक झालेल्यांकडून सखोल चौकशीची मागणी
Nashik Fraud News
बेरोजगारांच्या नावे बँक खाते उघडत परस्पर तब्बल १०० काेटींचे व्यवहारfile
Published on
Updated on

मालेगाव : सायबर भामट्यांनी देशभर धुमाकूळ घातलेला असतानाच मालेगावात अत्यंत गंभीर प्रकरण उजेडात आले आहे. नोकरीचे आमिष दाखवत १० ते १२ बेरोजगारांकडून कागदपत्रे घेत त्या आधारे बँकेत चालू खाते उघडत, त्यातून परस्पर एक -दोन नव्हे तर तब्बल १०० कोटींचे व्यवहार अवघ्या १५ ते २० दिवसांत केले गेलेत. हा प्रकार लक्षात येताच 'त्या' खातेदारांच्या तोंडचे पाणी पळाले. हे पैसे कोठून आलेत अन‌् कोठे वळते केले गेलेत, याविषयी उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या तरुणांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख विनोद वाघ यांनी पत्रकार परिषद घेत एकूण प्रकरणाची माहिती दिली.

तक्रारदारांनी सांगितलेली हकिकत अशी, कौळाणे येथील गणेश मिसाळ या तरुणाचे चारचाकी वाहन संशयित सिराज अहमद हारुन मेमन या व्यक्तीकडे भाड्याने होते. या ओळखीतून सिराजने मिसाळला बाजार समितीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. याच पद्धतीने शहर व तालुक्यातील १० ते १२ सुशिक्षित बेरोजगारांकडून बँकेत बचत खाते उघडण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे घेतली. मात्र, प्रत्यक्षात चालू खाते उघडले. शिवाय, पासबुक, चेकबुक स्वत:कडेच ठेवले. या तरुणांच्या नावाने वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून सिराजने अवघ्या १५ ते २० दिवसांत १०० कोटीपर्यंतचे व्यवहार केलेत. दरम्यान, एक तरुण बँकेत खाते उघडले की नाही, हे जाणून घेण्यासाठी बँकेत गेला असता त्याच्या खात्यावरून कोटींचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास येताच अवाक‌् झाला. तेव्हा इतर तरुणांनाही माहिती दिली असता त्यांच्या खात्यावरूनही असेच मोठे व्यवहार झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट देत गाऱ्हाणे मांडले. भुसे यांनी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशा मागणीचे प्रशासनाला निवेदन दिले आहे.

तर, यासंदर्भात वाघ यांनी फसवणूक झालेल्या तरुणांसोबत पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना कोट्यवधींचे व्यवहार तेही गैरमार्गाने झाल्याचा मुद्दा उपस्थित करत त्या व्यवहारांच्या सखोल चौकशीची मागणी केली. तेव्हा आता प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी संजय दुसाने, माजी उपमहापौर सखाराम घोडके, मनाेहर बच्छाव आदी उपस्थित होते.

या तरुणांच्या खात्यावरून झालेत असे व्यवहार

प्रतीक पोपट जाधव - 12 कोटी

जयेश लोटन मिसाळ - 14 कोटी

मनोज गोरख मिसाळ - 14 कोटी

धनराज देवीदास बच्छाव - 4 कोटी

राहुल गोविंद काळे- 14 कोटी

ललित नानाजी मोरे - 3.50 कोटी

गणेश लोटन मिसाळ- 16 कोटी

भावेश कैलास घुमरे - 4 कोटीदिवाकर कैलास घुमरे- 3 कोटी

पवन पोपट जाधव - 8 कोटीराजेंद्र नंदकुमार बिंद - 9 कोटी

दत्तात्रेय कैलास उशिरे (पाटील) - 1.42 लाख

सर्व खाते नियमाप्रमाणेच

दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणांनी संबंधित बँकेकडे व्यवहारांविषयी चौकशी केली. बँकेच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन सर्वांचे करंट खाते उघडले आहे. खातेदारांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या खात्यासंबंधी माहिती वेळोवेळी पुरविलेली आहे. ऑनलाइन व्यवहार झाल्यामुळे बँकेला त्याविषयी काही माहिती नसते. बँकेने सद्यस्थितीत हे सर्व खाते फ्रिज केले असल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

अशीही शक्कल

संशयिताने काही व्यवहार हे या तरुणांच्याच खात्यावर दाखवले असून, एकाच्या खात्यात एक कोटीची रक्कम दिसत असली तरी त्या आधारे ७५ लाखांचे कर्जही काढले आहे. मका खरेदीचा व्यवहार करण्यासाठी कंपनी उघडल्याचेही सांगितले गेल्याचे यावेळी सांगण्यात आले. पोलिस लवकरच चौकशी करणार असल्याने त्यानंतरच हा गैरप्रकार स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news