US Layoffs: अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांनी नोकरकपातीची घोषणा केली आहे. गेल्या आठवड्यात Amazon, UPS, Dow, Nike आणि Home Depot यांसारख्या कंपन्यांनी मिळून किमान 52 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या घोषणांमुळे, काही वर्षांपासून जोरात वाढत असलेल्या अमेरिकेतील रोजगार बाजारात आता मंदीचे वातावरण दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी आर्थिक अनिश्चितता, खर्च कमी करण्याची गरज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक नोकरकपात UPS कडून होणार असून, कंपनी सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. Amazon नेही सलग तीन महिन्यांत दुसऱ्यांदा नोकरकपात करत 16,000 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय Dow कंपनीत 4,500, Home Depot मध्ये 800, तर Nike मध्ये सुमारे 775 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
Goldman Sachs चे मुख्य अमेरिकी अर्थतज्ज्ञ डेव्हिड मेरिकल यांच्या मते, कंपन्या आता खुलेपणाने नोकरकपातीबाबत बोलू लागल्या आहेत आणि AI चा वापर करून मजुरीवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोविडनंतर ऑनलाइन खरेदीत मोठी वाढ झाल्याने अनेक कंपन्यांनी वेगाने भरती केली होती. मात्र, आता व्यापारातील अनिश्चितता आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे कंपन्या नव्या भरतीबाबत सावध दिसत आहेत.
अमेरिकेतील बेरोजगारी दर सध्या 4.4 टक्के असून तो कोरोनापूर्व पातळीपेक्षा अद्याप कमी आहे. Federal Reserve च्या अधिकाऱ्यांच्या मते, बेरोजगारी दरात काही प्रमाणात स्थिरता दिसत आहे. मात्र, डिसेंबरमध्ये केवळ 50 हजार नव्या नोकऱ्यांची भर पडली, ज्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहेत.
ऑनलाइन जॉब सर्च प्लॅटफॉर्म Indeed मधील अर्थतज्ज्ञ फेलिक्स ऐडाला म्हणतात की, जरी नोकरकपात वाढत असल्याचे चित्र दिसत असले, तरी ती अद्याप कोरोनापूर्व काळापेक्षा जास्त नाही. मात्र, भरतीचा वेग खूपच मंदावल्याने नोकरी गमावणाऱ्यांसाठी परिस्थिती अधिक कठीण होत आहे.
नवीन नोकर भरती मंदावल्यामुळे बेरोजगार असण्याचा मध्यम कालावधी 11.4 आठवड्यांपर्यंत वाढला असून, 2021 नंतरचा हा सर्वात जास्त कालावधी आहे. त्यामुळे एकूण आकडे स्थिर वाटत असले, तरी प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांसाठी नोकरी जाण्याची भीती आणि अनिश्चितता वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
काही फेड आणि ट्रेझरी अधिकाऱ्यांचे मत आहे की, वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रोजगार बाजारावर दिसणारा दबाव पुढील काही महिन्यांत कमी होऊ शकतो. 2025 मध्ये व्याजदर कपातीचे निर्णय घेण्यात आले असले, तरी सध्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर खर्चकपात करण्यावर भर देताना दिसत आहेत.
एकूणच, अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांमधील ही नोकरकपात रोजगार बाजार घसरत असल्याचे संकेत देत असून, पुढील काळात याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.