पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा आरबीआय चे २६ वे गव्हर्नर बनले आहेत. आरबीआयचे मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांचा कार्यकाळ आज १० डिसेंबर २०२४ ला संपला. दरम्यान, शक्तीकांत दास यांनी आज समारोपाच्या भाषणात आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांना शुभेच्छा दिल्या. "संजय मल्होत्रा यांच्याकडे कामाचा मोठा अनुभव आहे, मला खात्री आहे की ते सर्वोत्तम कामगिरी पार पाडतील..." असा विश्वास शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला.
यावेळी शक्तीकांत दास यांनी बोलताना गेल्या सहा वर्षांमध्ये आरबीआय आणि अर्थ मंत्रालय यांच्यातील मजबूत समन्वय अधोरेखित केला. ''संपूर्ण RBI टीमचे खूप खूप आभार. आम्ही एकत्रित मिळून अभूतपूर्व जागतिक धक्क्यांचा अपवादात्मक कठीण काळात यशस्वीपणे आर्थिक परिस्थिती हाताळली. आरबीआयने विश्वास आणि विश्वासार्हतेची संस्था म्हणून आणखी स्तर उंचावला पाहिजे. तुम्हा प्रत्येकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा.'' असे दास यांनी म्हटले आहे.
"रिझर्व्ह बँकेतील टीमवर्क हे माझ्या अनुभवानुसार, कदाचित खूप उच्च पातळीवर राहिले. मला माझ्या RBI टीमच्या प्रत्येक सदस्याकडून चांगले सहकार्य मिळाले. प्रत्येक सहकाऱ्याने कोरोनाच्या कठीण काळात सर्वोत्तम कामगिरी केली. RBIचे गव्हर्नर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. आरबीआयची धोरणे आणि अर्थव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने मी माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला." असे दास यांनी म्हटले आहे.
दास यांनी त्यांच्या संदेशात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. "अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आर्थिक-पतधोरण समन्वय चांगला राहिला आणि यामुळे गेल्या सहा वर्षात अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आम्हाला मदत झाली," असे शक्तिकांत दास यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले आहेत. ''RBI गव्हर्नर म्हणून मला देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आणि त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनासाठी पीएम मोदी यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या कल्पनांचा आणि विचारांचा खूप फायदा झाला'', असे दास यांनी नमूद केले आहे.