

गेल्या एका वर्षात अमेरिकन शेअर बाजाराने दमदार कामगिरी केली आहे. वर्षभरात नॅसडॅक 100 मध्ये सुमारे 32 टक्के आणि एसअँडपी 500 मध्ये सुमारे 31 टक्के वाढ झाली आहे. ही वृद्धी निफ्टी 100 आणि निफ्टी 500 सारख्या भारतीय बाजार निर्देशांकांच्या परताव्याच्या जवळपास समान आहे ज्यांनी अनुक्रमे सुमारे 31 टक्के आणि 32 टक्के परतावा दिला आहे.
अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर आधारित प्रचंड क्रांती झाली आहे. यामुळे अनेक अमेरिकन कंपन्यांच्या, विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या वाढीला वेग आला आहे. गेल्या वर्षीचा नफा सात प्रमुख तंत्रज्ञान समभागांमध्ये केंद्रित होता, परंतु एसअँडपी 500 मध्ये समाविष्ट नॉन-टेक्नॉलॉजी समभागांनी या वर्षी बाजी मारली आहे. आता महागाईची चिंता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत, यूएस फेडरल रिझर्व्हकडून आणखी अर्धा टक्का व्याजदरकपात होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तो बाजारासाठी बूस्टर ठरेल. अशा स्थितीत भारतीय गुंतवणूकदार अजूनही यूएस इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. तसे पाहता विविधतेच्या द़ृष्टिकोनातून यूएस इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ योग्य आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय पटलावर गुंतवणूक करताना अमेरिका हा पहिला पर्याय असायला हवा. कारण तो जागतिक बाजार भांडवलाच्या 60 ते 70 टक्के प्रतिनिधित्व करतो. डॉलरच्या तुलनेत रुपयात सरासरी 3 ते 4 टक्क्यांनी घसरण होत आहे. अशा परिस्थितीत चलन धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
तथापि, पश्चिम आशियातील संघर्ष आणि युक्रेन युद्धासारख्या भू-राजकीय तणावामुळे यूएस इक्विटीमधील गुंतवणुकीबाबत धोकाही वाढला आहे. तसेच अमेरिकन कंपन्यांचे सध्याचे मूल्यांकन खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) विदेशी गुंतवणुकीवर अनेक निर्बंध लादले असल्यामुळे अनेक गुंतागुंत निर्माण झाली आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला ज्या फंडात रस आहे तो पैसा स्वीकारत आहे की नाही हे शोधून काढावे लागते. तसेच, एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणुकीद्वारे गुंतवणूक करणे चांगले आहे की नाही हे देखील पहावे लागेल.