PES University Controversy Video Viral: पीपल्स एज्युकेशन सोसायटी युनिव्हर्सिटी (PES University) मधील एका वर्गात घडलेल्या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एका प्राध्यापकाने वर्गात एका मुस्लिम विद्यार्थ्याला 'दहशतवादी' संबोधल्याचा आरोप असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 24 मार्च रोजी घडली. अफान नावाच्या विद्यार्थ्याने वर्गातून बाहेर जाण्याची परवानगी मागितली असता, प्राध्यापक डॉ. मुरलीधर देशपांडे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्याचा आरोप आहे.
व्हिडिओमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्याला ओरडताना दिसतात आणि त्याला “तुला लाज नाही का?” असे म्हणत “दहशतवादी” असं म्हणल्याचं व्हिडिओत ऐकू येतं आहे. तसेच “तुमच्यासारख्या लोकांमुळे जगात समस्या निर्माण होतात” असेही विधान केल्याचा आरोप आहे.
ही संपूर्ण घटना एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
घटनेनंतर PES University प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत संबंधित प्राध्यापकाला निलंबित केलं आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितलं की, विद्यार्थ्याकडून तक्रार मिळाली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांनी असा आरोप केला की, पीडित विद्यार्थ्याला पाठिंबा देणाऱ्या इतर तीन विद्यार्थ्यांनाही वेगळ्या कारणांखाली निलंबित करण्यात आले. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली नाही.
या प्रकरणात National Students' Union of India (NSUI) ने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्राध्यापकांवर कठोर कारवाई करण्याची आणि सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संपूर्ण घटनेचा तपशील तपासला जात आहे. तपासानंतर दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी सन्मानाने वागणं अपेक्षित असताना, अशा प्रकारच्या आरोपांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे फक्त एका वर्गातील वाद नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील धर्मांधतेबद्दल चर्चा सुरू झाली आहे.