चुकीच्या अन्नसेवन पद्धतीचे दुष्परिणाम (Pudhari File Photo)
आरोग्य

Wrong Eating Habits | चुकीच्या अन्नसेवन पद्धतीचे दुष्परिणाम

अन्न न चावता थेट गिळण्याची सवय असणार्‍यांनी सावध राहणे आवश्यक आहे, कारण अशा प्रकारे जेवण करणार्‍यांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संजय गायकवाड

प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली वेगळी असते, तसेच खाण्यापिण्याच्या सवयीही वेगवेगळ्या असतात. काही लोक जेवण शांतपणे, प्रत्येक घास नीट चावून खातात, तर काहीजण जेवण गडबडीत थेट गिळतात. वेळेची काही मिनिटे वाचवण्यासाठी किंवा अनावधानाने तयार झालेल्या या सवयीमुळे अशा लोकांना केवळ अन्नाचा खरा स्वाद घेण्यापासून वंचित राहावे लागत नाही, तर त्यांचे आरोग्यसुद्धा हळूहळू बिघडत जाते.

सर्वप्रथम पचनाच्या समस्या या गडबडीने गिळण्याच्या सवयीमुळे दिसतात. नीट न चावता अन्न थेट पोटात गेल्यावर ते मोठ्या तुकड्यांच्या स्वरूपात पोटात पोहोचते. अशा वेळी पचनसंस्थेवर अधिक ताण पडतो. परिणामी अपचन, आम्लपित्त, गॅस, पोटफुगी (ब्लोटिंग) अशा त्रासांचा सामना करावा लागतो.

याशिवाय वजन वाढण्याचाही धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. कारण अन्न पटकन गिळल्यावर मेंदूपर्यंत पोट भरल्याचा संदेश वेळेत पोहोचत नाही. परिणामी, व्यक्ती आवश्यकतेपेक्षा अधिक खात राहते. तेच पुढे लठ्ठपणाचे एक मोठे कारण ठरते.

अन्न पटकन गिळल्यामुळे हवाही आत जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पोटदुखी, आकडी (क्रॅम्प्स) किंवा एकूणच अस्वस्थता जाणवू शकते.

पचन नीट न झाल्यामुळे हार्टबर्न आणि अ‍ॅसिड रिफ्लेक्स ही समस्या वारंवार उद्भवू शकते. छातीत जळजळ होणे किंवा आम्ल परत वर येणे हे त्याचे ठळक लक्षण आहे.

त्याचबरोबर अन्न नीट चावून न खाल्ल्यास शरीराला त्यातील पोषक घटक पूर्णपणे शोषून घेता येत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळात पोषणाची कमतरता जाणवू शकते. विशेषत: लहान मुलं व वयोवृद्ध व्यक्तींमध्ये घास घशात अडकण्याचा धोका अधिक असतो. यामुळे ‘चोकिंग’ची गंभीर समस्या उद्भवू शकते.

या सर्व त्रासांपासून बचाव करण्यासाठी साध्या-सोप्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. जेवताना प्रत्येक घास हळूहळू व नीट चावून खावा. एक घास किमान 20 वेळा तरी चावणे उपयुक्त ठरते. जेवत असताना फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करावे. घास छोटे-छोटे घ्यावेत आणि अन्नाचा स्वाद घेत घेत आनंदाने जेवावे. त्याचप्रमाणे टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा व्यत्यय आणणार्‍या गोष्टींपासून दूर राहून जेवण करणे सर्वाधिक हितकारक आहे.

या छोट्याशा बदलांमुळे केवळ पचन सुधारत नाही, तर शरीराला आवश्यक पोषण मिळते, वजनावर नियंत्रण राहते आणि चांगल्या आरोग्याकडे वाटचाल करता येते. म्हणजेच अन्न गडबडीत गिळण्याऐवजी शांतपणे, प्रत्येक घास चावून खाणे ही आरोग्य टिकवण्याची गुरुकिल्ली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT