आरोग्य

World Cancer Day : तिशीपूर्वी एचपीव्ही लस घ्या; तिशीनंतर एलबीसी तपासणी करा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लैंगिक संबंध न आलेल्या आणि लग्न न झालेल्या प्रत्येक तरुणीने, स्त्रीने एचपीव्ही लस घ्यावी, असा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिला आहे. विवाहित महिलांनी दरवर्षी लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी अर्थात एलबीसी आणि दर पाच वर्षांनी एचपीव्ही तपासणी करून घ्यावी, ही महत्त्वाची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. (World Cancer Day)

भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे अर्थात सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. गर्भाशय मुखातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाचा धोका उद्भवतो. असुरक्षित लैंगिक संबंध, एकाधिक लैंगिक भागीदार, लैंगिक संक्रमणातून होणारे आजार, गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकालीन वापर, धूम्रपान ही सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनुजा पाटील यांनी सांगितले. (World Cancer Day)

वयात येणार्‍या मुलींना एचपीव्ही लसीचे दोन डोस आणि पंधराव्या वर्षांनंतरच्या मुलींना लसींचे तीन डोस दिले जावेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विवाह होण्यापूर्वी किंवा लैंगिक संबंध प्रस्थापित होण्यापूर्वी एचपीव्हीची लस घेतल्यास अधिक परिणामकारक ठरते. एकाधिक लैंगिक भागीदार असलेल्या महिलांनी कधीही लस घेतली, तरी परिणामकारक ठरू शकते. तिशीनंतर विवाह झाला असेल आणि एक-दोनदाच लैंगिक संबंध आले असतील, तर अशा स्त्रियांमध्ये लसीची परिणामकारकता 30-40 टक्के असते, अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी यांनी दिली. सध्या एचपीव्ही लसीची किंमत साडेतीन ते चार हजार रुपये इतकी आहे. सीरमची लस बाजारात आल्यावर त्याची किंमत 300 ते 400 रुपये इतकी असेल.

स्तनांचा कर्करोगही चिंता वाढवतोय
स्थूलता, बदलती जीवनशैली, अनुवंशिकता, प्लास्टिकचा अतिरिक्त वापर, अशा विविध कारणांमुळे स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. आपल्या कुटुंबातील स्त्रीला ज्या वयात स्तनांचा कर्करोग झाला असेल, त्या वयात आपण पोहोचण्याच्या पाच वर्षे आधीपासूनच नियमित तपासणी आवश्यक असते. मासिक पाळी येऊन गेल्यावर दर महिन्याला 'सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन' करावे. वयाच्या चाळिशीनंतर मॅमोग्राफी दर पाच वर्षांनी करावी. कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्यास 'ब्राका' नावाची तपासणी करून आपल्यामध्ये स्तनांचा कर्करोग अनुवंशिकतेने आला आहे का? हे तपासता येते.
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग तज्ज्ञ

कधी आणि कोणती तपासणी करावी?

  • गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी सामान्यत: पॅप स्मीअर ही तपासणी केली जाते. तिशी-पस्तिशीनंतर दर वर्षी तपासणी करून घ्यावी.
  • लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी ही तपासणी अधिक परिणामकारक मानली जाते. योनीमार्गातून गर्भ पिशवीची तपासणी यामध्ये केली जाते. ही तपासणी दरवर्षी केल्याने कर्करोग उद्भवला असल्याचे लवकरात लवकर निदान होऊ शकते.
  • एचपीव्ही तपासणी दर पाच वर्षांनी करावी.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT