Wisdom Tooth 
आरोग्य

Wisdom Tooth|अक्कलदाढेचा ठणका असह्य होतोय? जाणून घ्या दाढ का दुखते आणि त्यावरील प्रभावी उपचार

हिरड्यांना सूज, ताप आणि डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

पुढारी वृत्तसेवा

डॉ. निखिल देशमुख, दंतवैद्यक

बहुतांश व्यक्तींमध्ये जबड्याचा आकार पूर्ण विकसित झालेला असतो. यामुळे या नवीन दाढेला उगवण्यासाठी पुरेशी जागा उरत नाही. परिणामी, ही दाढ येताना आजूबाजूच्या हिरड्यांवर आणि दातांवर प्रचंड दबाव निर्माण होऊन तीव्र वेदना सुरू होतात. अक्कलदाढ पूर्णपणे बाहेर न येता हिरडीतच अडकून राहणे, हे दुखण्याचे सर्वात मुख्य कारण ठरते.

अनेकदा दाढ तिरपी किंवा आडवी आल्यामुळे ती शेजारच्या दुसऱ्या दाढेला ढकलते. यामुळे दातांच्या रांगेत बदल होतो आणि जबड्यात ठणक जाणवू लागते. जेव्हा ही दाढ अर्धवट बाहेर येते, तेव्हा त्याभोवती हिरडीचा एक छोटा पापुद्रा तयार होतो. या भागात अन्नाचे कण साचून राहतात आणि तिथे जीवाणूंची वाढ होते. या स्थितीला ‌‘पेरिकोरोनायटिस‌’ असे म्हणतात. यामुळे हिरड्यांना सूज येणे, पू होणे आणि तोंडाला दुर्गंधी येणे असे त्रास उद्भवतात. काही प्रकरणांमध्ये संसर्ग इतका वाढतो की, रुग्णाला ताप येतो, कान आणि डोके दुखू लागते, तसेच तोंड उघडताना किंवा घास घेतानाही प्रचंड त्रास होतो.

या वेदनांचे निदान करण्यासाठी प्रामुख्याने एक्स-रेचा वापर केला जातो. याद्वारे दाढेचा कोन आणि तिची मुळे नेमकी कुठे आहेत, हे स्पष्ट होते. प्राथमिक अवस्थेत संसर्ग कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातात. संसर्ग कमी करण्यासाठी अँटिसेप्टिक माऊथवॉशचा वापरही उपयुक्त ठरतो. दाढ वारंवार त्रास देत असेल किंवा तिची स्थिती शेजारच्या दातांना धोकादायक असेल, तर शस्त्रक्रियेद्वारे ती काढून टाकणे हाच कायमस्वरूपी आणि सुरक्षित उपाय मानला जातो. आजच्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ आणि वेदनारहित पद्धतीने करता येते.

घरगुती स्तरावर तात्पुरता आराम मिळवण्यासाठी कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे अत्यंत प्रभावी ठरते. मिठाच्या पाण्यामुळे तोंडातील नैसर्गिक स्वच्छता होते आणि सूज कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त गालाच्या बाहेरील बाजूने बर्फाने शेकल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि वेदनांची तीव्रता कमी होते. हे उपाय केवळ तात्पुरते असतात. हिरड्यांमधून रक्त येत असेल, चेहरा सुजला असेल किंवा गिळताना त्रास होत असेल, तर विलंब न करता तज्ज्ञ दंतवैद्याचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT