Spicy Food Psychology fil
आरोग्य

Psychology: मानसशास्त्रानुसार, ज्यांना तिखट पदार्थ आवडतात त्यांच्यात असते 'या' गोष्टीची तीव्र इच्छा

Spicy Food Psychology: जेवणात चमचमीत आणि तिखट-झणझणीत पदार्थांवर ताव मारणे अनेकांना आवडते. मात्र, तिखट खाण्याच्या या आवडीचा संबंध माणसाच्या व्यक्तिमत्त्वाशी असतो.

पुढारी वृत्तसेवा

Spicy Food Psychology

नवी दिल्ली: जेवणात चमचमीत आणि तिखट झणझणीत पदार्थांवर ताव मारणे अनेकांना आवडते. मात्र, तिखट खाण्याची ही आवड केवळ जिभेचे चोचले पुरवण्यापुरती मर्यादित नसून, त्याचा थेट संबंध माणसाच्या व्यक्तिमत्त्वाशी असतो, असा खुलासा एका मानसशास्त्रीय संशोधनातून झाला आहे. ज्या लोकांना तिखट किंवा मसालेदार अन्न जास्त आवडते, त्यांच्यामध्ये धाडस करण्याची, नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याची आणि थ्रिल अनुभवण्याची तीव्र इच्छा असते, असे अन्न संशोधक आणि मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासात समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, मिरची खाल्ल्यानंतर जाणवणारा तिखटपणा ही चव नसून ती एक वेदना आहे. मिरचीमध्ये 'कॅप्सेसिन' नावाचे घटक असते. ते तोंडात जाताच मेंदूतील वेदना सांगणाऱ्या पेशी सक्रिय होतात आणि जळजळू लागते. शरीर या जळजळीला सौम्य ताण समजते. या ताणाचा सामना करण्यासाठी मेंदूतून 'एंडॉर्फिन' सारखी आनंद वाटणारी संप्रेरके स्त्रवतात. त्यामुळे सुरुवातीला होणाऱ्या त्रासानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. वेदना आणि आनंदाच्या याच अनोख्या खेळामुळे लोक तिखट खाण्याचे शौकीन बनतात.

...म्हणून आवडते तिखट

मानसशास्त्रात 'सेन्सेशन सीकिंग' नावाची एक संकल्पना आहे. याचा अर्थ नवनवीन, आव्हानात्मक आणि तीव्र अनुभव घेण्याची माणसाची प्रवृत्ती. तिखटप्रेमी लोक मिरचीच्या उष्णतेमुळे होणारा तात्पुरता त्रास टाळण्याऐवजी त्याचा आनंद घेतात. शास्त्रज्ञांच्या मते, तिखट अन्न खाणे म्हणजे सुरक्षित वातावरणात रोमांच अनुभवण्याचा एक मार्ग आहे. तिखट खाताना हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो आणि शरीरात ॲड्रिनॅलिनचा स्तर वाढतो, परंतु बहुतेक निरोगी व्यक्तींसाठी प्रत्यक्ष धोका कमीच असतो. मानसशास्त्रज्ञ या स्थितीला 'बिनाइन मॅसोकिझम' म्हणजेच स्वतःला त्रास करून घेण्यातून मिळणारा आनंद म्हणतात.

जोखीम पत्करण्यासाठी असतात तयार

संशोधनानुसार, ज्यांना तिखट पदार्थ आवडतात ते सर्वसाधारणपणे नवीन अनुभव घेण्यास अधिक उत्सुक असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना तिखटपणा आवडतो, त्यांना आयुष्यात साहसी गोष्टींचीही आवड असते. अशा लोकांना नवनवीन ठिकाणी प्रवास करणे, वेगवेगळे छंद जोपासणे आणि नवीन सामाजिक अनुभव घेणे आवडते. तिखट खाणाऱ्यांमध्ये जोखीम पत्करण्याची वृत्ती इतरांपेक्षा थोडी जास्त असते. अर्थात, हा नियम सर्वांनाच लागू होतो असे नाही. काही लोक केवळ चवीसाठी देखील तिखट खाणे पसंत करतात.

महत्त्वाचा निष्कर्ष

त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही एखाद्याला ताटात जास्त तिखट किंवा मिरची खाताना पाहाल, तेव्हा ती केवळ त्यांची खाद्यसंस्कृती नसून, त्यांच्यातील साहसी आणि बिंधास्त व्यक्तिमत्त्वाची ती एक झलक असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT