रोज 10 हजार पावलं चालणं आरोग्यासाठी चांगलं आहे, हे आपण सगळेच जाणतो. यामुळे वजन कमी होतं, हृदयाचं आरोग्य सुधारतं, तणाव कमी होतो आणि शरीराला उर्जा मिळते. पण फक्त पावलं मोजणं पुरेसं नाही. चालताना आपण काही छोट्या चुका केल्यास ही मेहनत वाया जाऊ शकते. तज्ज्ञ सांगतात की चालताना केलेल्या या ४ चुका तुमच्या वॉकचा पूर्ण फायदा होऊ देत नाहीत.
अनेकांना वाटतं की पाणी फक्त जिममध्ये वर्कआउट करतानाच प्यायला लागतं, पण वॉकदरम्यानही घामातून शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. पुरेसं पाणी न प्यायल्यास थकवा, चक्कर, स्नायूंमध्ये गोळे येणे आणि उर्जेची कमतरता जाणवते. त्यामुळे कॅलरी बर्न होणंही कमी होतं.
उपाय : वॉकला जाण्याच्या ३० मिनिटं आधी पाणी प्या आणि लांब वॉकसाठी पाण्याची बाटली सोबत ठेवा.
चप्पल, सँडल किंवा फॅन्सी पण अनकम्फर्टेबल शूज घालून चालणं ही मोठी चूक आहे. असे फुटवेअर पायांना योग्य सपोर्ट देत नाहीत, त्यामुळे पाय दुखणे, छाले, टाचेला इजा, तसेच गुडघे-कंबरदुखी होऊ शकते.
उपाय : नेहमी चांगल्या क्वालिटीचे स्पोर्ट्स शूज किंवा वॉकिंग शूज वापरा. ते आरामदायक असावेत आणि टाचेला योग्य सपोर्ट द्यायला हवेत.
अचानक चालायला सुरुवात करणं किंवा थेट थांबणं शरीरासाठी हानिकारक आहे. वॉर्म-अप न केल्यास स्नायूंमध्ये ताण, दुखापत होऊ शकते. तसेच अचानक थांबल्यास हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक कमी होतो, ज्यामुळे चक्कर येऊ शकते.
उपाय : वॉक सुरू करण्याआधी ५ मिनिटं हलकं स्ट्रेचिंग करा आणि हळू चालायला सुरुवात करा. वॉक संपल्यावरही हळूहळू थांबा आणि पुन्हा स्ट्रेचिंग करा.
काहींना वाटतं की मोठी पावलं टाकली की चालण्याचा जास्त फायदा होतो. पण हे चुकीचं आहे. खूप मोठं पाऊल टाकल्याने शरीराचा बॅलन्स बिघडतो, स्नायूंवर आणि सांध्यांवर ताण येतो, ज्यामुळे दुखापत होऊ शकते.
उपाय : नैसर्गिक आणि आरामदायी पावलं टाका. वेगानं चालताना पाऊलं आपोआप थोडी मोठी होतात, त्यासाठी जबरदस्ती करू नका.