

डॉ. मनोज शिंगाडे
चेन्नईतील मद्रास डायबिटीज रिसर्च फाऊंडेशन म्हणजेच एमडीआरएफ आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांनी नुकत्याच केलेल्या संयुक्त संशोधनात डायबिटीजचा एक नवा प्रकार उघडकीस आला आहे.
आतापर्यंत टाईप 1, टाईप 2 किंवा गर्भावस्थेतील डायबिटीज या प्रचलित स्वरूपांबरोबरच मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये होणार्या आनुवंशिक स्वरूपाला मोडी म्हणजेच ‘मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज ऑफ द यंग’ असे नाव दिले जाते. या मोडी डायबिटीजचा अजून एक विशिष्ट प्रकार संशोधकांच्या नजरेस आला असून तो एबीसीसी 8 नावाच्या जनुकामधील बदलाशी निगडित आहे.
या संशोधनात असे दिसून आले की, एबीसीसी8 जीन हा पॅन्क्रियाजमधील इन्सुलिन निर्माण करणार्या बीटा पेशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या जीनमध्ये झालेला बदल म्हणजेच म्युटेशन सुरुवातीला मुलांमध्ये किंवा नवजातांमध्ये लो शुगर म्हणजेच जन्मजात हायपरइन्सुलिनिझमचे लक्षण निर्माण करतो. अशा मुलांना सुरुवातीला सतत कमी साखरेच्या त्रासाला सामोरे जावे लागते; परंतु जसजसे वय वाढते तसतसे या मुलांमध्ये उलट परिस्थिती निर्माण होते आणि पुढे जाऊन त्यांना डायबिटीजचा त्रास सुरू होतो. त्यामुळे एकाच जीनमधील वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांमुळे शरीरात कधी जास्त इन्सुलिन तयार होऊन हायपोग्लायसेमिया म्हणजे कमी साखर निर्माण होते, तर कधी कमी इन्सुलिन तयार होऊन डायबिटीज म्हणजेच जास्त साखरेचा आजार उद्भवतो.
या अभ्यासातून हे स्पष्ट झाले की, सर्व मोडी रुग्णांना एकसारखा उपचार देता येत नाही. कारण, प्रत्येक प्रकाराच्या जीन म्युटेशननुसार औषधांचा परिणाम वेगळा होतो. उदाहरणार्थ, या नव्याने सापडलेल्या प्रकारात सल्फोनिल्युरिया गटातील औषधांचा काहीही उपयोग होत नाही, तर इतर प्रकारांत हीच औषधे प्रभावी ठरतात. त्यामुळे योग्य निदानासाठी आणि अचूक उपचार पद्धती ठरवण्यासाठी जेनेटिक तपासण्या आणि प्रयोगशाळा चाचण्या करणे आवश्यक आहे.
सध्या या प्रकारच्या डायबिटीजला थांबवण्यासाठी किंवा पूर्णपणे बरे करण्यासाठी कोणतेही औषध किंवा उपाय उपलब्ध नाहीत. कारण, तो जनुकांमधील दोषामुळे जन्मतःच होतो; मात्र कुटुंबात ही समस्या आधीपासून असल्यास किंवा मुलांमध्ये वारंवार लो शुगरची लक्षणे दिसल्यास वेळेत तपासणी करून निदान करणे शक्य आहे. त्यानंतर योग्य वैद्यकीय देखरेख व उपचार सुरू करता येतात. संशोधकांचे मत आहे की, आज कॅन्सरमध्ये प्रत्येक रुग्णाच्या पेशींतील आण्विक बदल लक्षात घेऊन वैयक्तिकृत उपचार केले जातात, तसेच डायबिटीजमध्येही आता ‘प्रिसिजन मेडिसिन’ म्हणजेच वैयक्तिक उपचार पद्धतीची गरज आहे. हा नवा अभ्यास डायबिटीज उपचाराच्या त्याच दिशेने टाकलेले पहिले आणि महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.